देशात रोजंच होत आहेत बलात्कारः मुख्य न्यायधीशांची टीका

नवी दिल्ली: देशात १६ डिसेंबरसारख्या घटना रोजच घडत असल्याची टीका करून भारताचे मुख्य नायधीश अल्तमास कबीर यांनी; ज्या दिवशी दिल्लीत सामूहिक बलात्काराचा निर्घृण प्रकार घडला त्याच दिवशी एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकल्याची घटना घडल्याकडे लक्ष वेधले.

धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराचा खटला आणि यापुढे दाखल होणारे महिला अत्याचार विषयक खटले वेगाने निकाली काढण्यासाठी स्थापन झालेल्या द्रुतगती न्यायालयाचे उद्घाटन न्या. कबीर यांच्या हस्ते करण्यात आले.

राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात लोकांकडे आलेल्या पैशानेच गुन्हेगारी प्रवृत्ती बळावल्याची टीका यांनी केली. दिल्ली आणि परिसरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आला आहे. या पैशाचे करायचे काय; असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यातूनच त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असल्याचे मत न्या. कबीर यांनी यावेळी व्यक्त केले.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या काळ्या काचा काढून टाकाव्या आणि त्याला पडदे नसावेत; अशी मार्गदर्शक सूत्र सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच जरी केली आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली असती तर कदाचित १६ डिसेंबरचे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य टळले असते; असे मतही त्यांनी व्यक्त केले.