रजनी पाटील यांचा बिनविरोध राज्यसभेत जाण्याचा मार्ग सुकर

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे त्यांचा राज्यसभेत बिनविरोध जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

राज्यसभेत ज्या जागेवर पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे; ती जागा माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आहे. पाटील या महिला आहेत आणि त्या मराठवाड्याच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांच्या विरोधात युतीचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या निवडणुकीसाठी विलासरावांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी द्यावी अशी देशमुख यांच्या निकटवर्तीयांची मागणी होती. याशिवाय सुबोध मोहिते, मधुकरराव चव्हाण, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, उत्तमसिंह पवार आणि रजनी पाटील यांच्या नावाची चर्चा होती. विलासरावांच्या घरात उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर मराठवाड्याचे उमेदवार म्हणून चाकूरकरांचे नाव पुढे आले. मात्र सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला वाव नसल्याने त्यांना राज्यपाल पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर इच्छुकांवर मात करून रजनी पाटील यांनी तिकीट मिळविण्यात यश मिळविले आहे.

विलासरावांचे पुत्र अमित यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांना राज्यात मंत्रिपद मिळावे अशी मागणी आता देशमुख गटाकडून केली जात आहे.