मुंबई दि. ३१ – नवीन वर्षात म्हणजे २०१३ मध्ये मौल्यवान धातू गणल्या जाणार्या सोन्याचे दर २९ हजार ते ३३ हजार या दरम्यानच राहतील असा अंदाज अर्थक्षेत्रातील तज्ञांनी व्यकत केला आहे. अर्थव्यवस्थेत वेगाने होत असलेली सुधारणा आणि कांही आंतरराष्ट्रीय घडामोडी यामुळे सोने दर कांही काळ वाढले तरी ते लगेच कमी होतील असे त्यांचे म्हणणे आहे.
कोटक कम्युनिटी सव्र्हिसेसच्या विश्लेषक माधवी मेहता यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुतेक मध्यवर्ती बँका त्यांच्याकडील सोन्याचा स्टॉक नवीन वर्षात वाढवतील असे संकेत मिळत आहेत. ब्राझील आणि रशिया यांनीही या नव्या वर्षात त्यांच्याकडील सोने स्टॉक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही २०१३ मध्ये सोन्याचे दर २८ हजार ते ३२ हजार प्रति दहा ग्रॅम असे राहतील. रूपया स्थिर होऊन त्याचा दर डॉलरला ५० रूपयांवर स्थिरावेल असे संकेत आहेत. त्यातच अर्थव्यवस्थेतही वेगाने सुधारणा होत आहे आणि हा वेग अधिक वाढला तर परदेशी गुंतवणूकदार संस्था शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करतील. परिणामी सोन्याचे दर स्थिरावायला मदत मिळेल.
जागतिक बाजारातही सोन्याचे दर १५५० ते १८५० डॉलर्स प्रति औंस असेच राहतील असेही या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. मागच्या आठवड्यात देशात सोन्याचे दर ३०.६०० वर स्थिर राहिले आहेत. आगामी काळात ते आणखी थोडे घसरतील व पुन्हा वाढतील असे सांगण्यात येत आहे.