इस्लामाबाद: कोणत्याही हुकूमशहाला जनतेच्या अधिकारांवर अतिक्रमण करू देणार नाही; अशी शपथ घेऊन पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या पाचव्या पुण्यतिथॆचे औचित्य साधून त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानच्या राजकारणात अधिकृतरित्या प्रवेश केला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना आपल्या आईच्या मारेकर्यांना शिक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत बिलावल यांनी न्यायपालिकेवरही कठोर टीका केली. बेनझीर यांची दि. २७ डिसेंबर २००७ रोजी निवडणूक प्रचारायात्रेदरम्यान हत्या झाली होती. दहशतवाद्यांना आपण अजिबात घाबरत नसल्याचेही बिलावल यांनी यावेळी स्पष्ट केले.
झुल्फिकार आली भुट्टो यांना देहदंड देण्याचा पुनर्विचार करण्याची राष्ट्रपती असिफ आली झरदारी यांची सूचना मुख्य न्यायाधीशांनी का विचारात घेतली नाही; असा सवालही बिलावल यांनी केला.
आपली आई बेनझीर हिने आपल्याला ज्या रस्त्यावरून चालायला शिकविले तो रस्ता काट्यांनी, अडथळ्यानी आणि आसवांनी भरलेला आहे. मात्र आपला त्याच रस्त्यावरून मार्गक्रमणा करण्याचा ठाम निर्धार आहे; अशा भावपूर्ण शब्दात बिलावल यांनी उपस्थितांना सहकार्याचे आवाहन केले.
पाकिस्तानात पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीची सर्व सूत्रे बिलावल यांच्याकडे सोपविण्यात येणार आहेत. मात्र बिलावल वयाची पंचविशी पूर्ण करीत नसल्याने त्यांना स्वत:ला निवडणूक लढवित येणार नाही.