मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि उर्जा मंत्रालयाचा कार्यभार पुन्हा सोपविण्यात आला आहे. राजीनामा नाट्यानंतर तेवढ्याच नाट्यमय रीतीने पुन्हा उपमुख्यमंत्री विराजमान झालेल्या पवारांना २० दिवस बिनखात्याचे मंत्री राहावे लागले. मात्र बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने जरी केलेल्या अधिसूचनेनुसार अजितदादा यांच्याकडे पूर्वीचेच २ विभाग पुन्हा सुपूर्त करण्यात आले आहेत.
सिंचन घोटाळा प्रकरणी झालेल्या आरोपांनंतर अजित पवार यांनी अचानक आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सिंचन विभागाची चौकशी नि:पक्षपातीपणे पार पदवी यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी त्यावेळी दिले. मात्र सिंचन श्वेतपत्रिकेची औपचारिकता पार पाडून दादांनी स्वत:ला शुचिर्भूत करून घेतले आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अचानकपणे ते मंत्रिमंडळात परतले. मात्र त्यांच्याकडे कोणतेही खाते देण्यात आले नव्हते.