लाहोर दि. १७ – मुंबई हल्ल्यासंबंधाने भारताला हवा असलेला अतिरेकी हफीज सईद याच्याविरोधात भक्कम पुरावे भारताने न दिल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे भारत भेटीवर आलेले मंत्री मलीक यांनी केले असतानाच पाकिस्तानात या हफीज सईदने भारत विरोधाचा नारा दिला आहे. मोस्ट फेव्हर्ड नेशन स्टेटस भारताला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानने देऊ नये म्हणून त्याने चळवळ सुरू केली असून त्यासाठी वाघा बॉर्डरवर काढण्यात आलेल्या शांतता मोर्चात हजारो जण सामील झाले होते. यावेळी या मोर्चात जिहादच्या घोषणाही देण्यात आल्या.
नाटो फौजांच्या हल्ल्यात २४ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्यानंतर लष्करे तैय्यबाचा प्रमुख असलेल्या हफीजने ४० विविध धार्मिक आणि दहशतवादी संघटना स्थापन केल्या आहेत.लष्करेवर बंदी आणण्यासाठी अमेरिकेनेही दबाव आणल्यानंतर या संस्था त्याने सुरू केल्या असून अमेरिकेने हफीज सईदवर १० लाख डॉलर्सचे पारितोषिकही जाहीर केले आहे. हफीजने भारताविरोधात सुरू केलेल्या चळवळीत केलेल्या भाषणात पाकिस्तान सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात इंडियन कॉलनी करू देणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे आणि अफगाणिस्तानात भारत अतिरेकयांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेत असल्याचा आरोपही केला आहे.