इस्लामाबाद दि.११ – पाकिस्तानी पार्लमेंटने तालिबानींविरोधात उभ्या राहिलेल्या १४ वर्षीय मलाला युसुफझाई हिला डॉटर ऑफ पाकिस्तान किताबाने गौरविले जावे असा ठराव आज एकमताने मंजूर केला. पाकिस्तान राष्ट्रीय संसदेच्या खालच्या सभागृहात सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या कायदेतज्ञ रोबीना कैमखानी यांनी हा ठराव मांडला. तालिबान्यांनी मलाला हिच्यावर हल्ला करून तिच्या डोक्यात गोळी घातली होती. आता तिच्यावर ब्रिटन येथे उपचार सुरू आहेत.
रोबीना म्हणाल्या की मलाला जगभरातील मुलांच्या शिक्षणासाठी झटणारी रोल मॉडेल ठरली असून तिने केलेला त्याग आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून दिलेला लढा जगाच्या इतिहासातच महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे तिला हा सन्मान मिळणे हा तिचा हक्क आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांनी ब्रिटनमध्ये तिची नुकतीच भेट घेतली आणि आता ते फ्रान्समध्ये स्टँड अप फॉर मलाला नावाने साजर्याक होत असलेल्या परिषदेसाठी पॅरिसला रवाना झाले असून पाकिस्तान आणि युनेस्को यांच्या संयुक्त सहकार्यातून ही परिषद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मलाला हिला डॉटर ऑफ पाकिस्तान हा किताब दिला जात आहे.
मलाला हिने दिलेला लढा केवळ तिच्या साठी नसून तो देशाच्या उज्जल भवितव्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रेरणादायी असल्याचेही रूबीना यांनी आवर्जून नमूद केले.