झरदारींनी घेतली मलालाची भेट

लंडन दि.१०- पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी ब्रिटनमध्ये उपचार घेत असलेल्या मलाला युसुफझाई हिची रूग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तिच्यावर उपचार करणार्या  डॉक्टरांजवळ तिच्या प्रकृतीची चौकशीही केली. यावेळी झरदारी याच्याबरोबर त्यांची मुलगी असीफा भुट्टो याही होत्या. झरदारी यांनी मलालाचे तिने दाखविलेल्या धैर्याबद्दल कौतुक केले आणि तिचा पाकिस्तानला अभिमान वाटतो अशाही भावना व्यक्त केल्या.

तालिबान्यांच्या विरोधात बोलल्याबद्दल मलाला या १५ वर्षीय शालेय मुलीवर तालिबान्यांनी हल्ला चढवून तिच्या डोक्यात गोळी घातली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मलालाला ब्रिटनमधील एलिझाबेथ रूग्णालयात हलविण्यात आले होते तेथेच तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. मलाला ने झरदारी यांना पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो या तिच्या आदर्श असल्याचे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच ती जगणार असल्याचे सांगितले.

झरदारी यांनी या भेटीच्या वेळी ब्रिटन सरकारचे तसेच मलाला वर उपचार करणार्यान रूग्णालयातील सर्व डॉक्टरांचे आणि जगभरात मलाला साठी प्रार्थना करणार्यां सर्व नागरिकांचे आभार मानले असून पाकिस्तान सरकार कोणतीही किंमत मोजेल मात्र देशातील मुलींना शिक्षण देईलच असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.