भारतीय पर्यटन व्हिसाचे नियम शिथील

नवी दिल्ली: पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पर्यटन व्हिसाचे नियम शिथील केले आहेत. त्यानुसार विदेशी नागरिकांना भारताच्या २ भेटींमध्ये दोन महिन्याचे अंतर ठेवण्याचे बंधन शिथील करण्यात आले आहेत. मात्र पाकिस्तान आणि अन्य काही देशांच्या पर्यटकांवर २ महिन्याच्या अंतराचेबंधान कायम ठेवण्यात आले आहे.

मुंबईवर झालेल्या २८/११ च्या वेळी या हल्ल्याचा एक मास्टरमाईंड असलेल्या लष्कर ए तैय्याबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली याने मल्टीपल एन्ट्री व्हिसाचा गैरवापर करून देशाच्या विविध ठिकाणी हेरगिरी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सन २००९ पासून दोन भेटींमध्ये २ महिन्याचे अंतर ठेवण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला होता. मात्र यामुळे भारताला भेट देऊ इच्छिणार्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट होत असून या नियमाचा पुनर्विचार केला जावा अशी विनंती पर्यटन विभागाने पंतप्रधान कार्यालयाला केली होती. पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार गृह मंत्रालयाने या नियमात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र पाकिस्तान, चीन, इराण, इराक, बांग्लादेश, अफगाणीस्तान आणि सुदान या देशांच्या नागरिकांसह पाकिस्तानी किंवा बांग्लादेशी मूळ असलेल्या नागरिकांवर किंवा कोणतेच नागरिकत्व नसलेल्या नागरिकाना दोन महिन्याच्या अंतराचा नियम लागू राहणार आहे.