धनाढ्यांच्या बॉडीगार्ड बनण्याची चीनी तरूणींत क्रेझ

बिजिग दि.३० – चीनमध्ये ३०० वर पोहोचलेली अब्जाधीशांची संख्या आणि १० लाखांहून अधिक असलेले कोट्याधीश यांच्या बॉडीगार्ड बनण्यासाठी चीनी तरूणी अत्यंत उत्सुक असून हे धनाढ्यही अशा लेडी बॉडीगार्ड बाळगणे हा स्टेटस सिंबॉल मानत असल्याचे दिसून येत आहे. खासगी संरक्षक म्हणून या तरूणींना प्रचंड मागणी असल्याने अनेक जणी आपले सध्याचे करीयर मध्येच सोडून बॉडीगार्ड बनण्याचे प्रशिक्षण हजारेा डॉलर्सची फी भरून घेत असल्याचेही दिसून येत आहे.

चिनी अभिनेता जॅकी चॅन याच्यासाठी बॉडीगार्ड म्हणून काम केलेल्या योंगविग याने तरूणींना बॉडीगार्डचे शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र कोचिंग क्लासच सुरू केले आहेत. आपल्या मालकावर कोणतेही संकट येताना दिसले तर त्यातून त्याला कसे वाचवायचे आणि हल्ला झाल्यास हल्लेखोराला अस्मान कसे दाखवायचे याचे शिक्षण तो देत आहे. विशेष म्हणजे या कामात असलेला शारीरिक धोका पत्करूनही मोठ्या संख्येने तरूणी हे प्रशिक्षण घेत आहेत. त्यासाठी ३००० डॉलर्सची भरभक्कम फीही भरत आहेत असे त्याचे म्हणणे आहे.

अर्थात केवळ फी भरली म्हणजे शिक्षण मिळत नाही तर त्यासाठी कांही नियम काटेखोरपणे पाळणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचे तर या तरूणींना २८ वर्षांपर्यंत विवाह करण्यास मनाई आहेच पण त्यापूर्वी त्यांनी डेटिंगवरही जायचे नाही असाही नियम आहे म्हणे !