दिल्लीतील उद्योजक आणि काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांना त्यांच्या काही बातम्या दडपण्याच्या बदल्यात १०० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात झी टीव्ही या वृत्तवाहिनीच्या दोघा ज्येष्ठ पत्रकारांना काल पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अटक करण्यात आलेले पत्रकार सुधीर चौधरी हे झी बिझनेस या वाहिनीचे संपादक आहेत आणि दुसरे पत्रकार समीर अहलुवालिया हे बिझनेस विभागाचे प्रमुख आहेत.
माध्यमांची विश्वासार्हता
सध्या आपल्या माध्यमांच्या जगामध्ये वृत्तवाहिन्यांचा प्रभाव वाढत चाललेला आहे. परंतु त्यांचा प्रभाव ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात त्यांची विश्वासार्हता कमी होत आहे. केवळ झी टीव्हीच नव्हे तर अन्य सर्व वृत्तवाहिन्या लोकांच्या नजरेतून उतरत आहेत. भारतामध्ये केबल कनेक्शन स्वस्त झाल्यामुळे लोकांना अनेक वृत्तवाहिन्या कमीत कमी पैशामध्ये घरात बसून बघायला मिळत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या वाहिन्यांविषयी लोकांमध्ये उत्सुकता आणि आदर होता. परंतु हळू हळू या वाहिन्यांवरून दिल्या जाणार्याा बातम्या वस्तुनिष्ठ नसल्याचे जाणवायला लागले आणि हा आदर कमी झाला.
या वाहिन्यांमध्ये दिल्या जाणार्याा बातम्या त्यांच्या वृत्तमूल्यानुसार दिल्या जात नाहीत. एखाद्या बातमीला बातमी म्हणून जे महत्व असते किवा समाजावर त्या घटनेचा जो परिणाम होणार असतो त्या प्रमाणात तिला प्रसिद्धी मिळत नाही. या उलट एखादी बातमी कमी महत्वाची असून सुद्धा तिला अनावश्यक महत्व दिले जाते. काही वेळा काही मोठ्या लोकांचे स्टिंग ऑपरेशन करण्याच्या नावावर त्याचा आवाज किवा त्याने केलेल्या दुष्कृत्याची ध्वनिचित्रफीत तयार करून ती वारंवार एखाद्या विशिष्ट वाहिनीवर वाजवली जाते, दाखवली जाते. ती इतक्या वेळा दाखवली जाते की, ते प्रकरण बातमी म्हणून एवढी महत्वाची आहे की नाही असा प्रश्न कोणालाही पडू शकतो.
अशा अवाजवी महत्व दिलेल्या बातम्या त्या वृत्तवाहिनीच्या मालकांच्या हितसंबंधांच्या असतात आणि त्यांच्या हितसंबंधांसाठी या वृत्तवाहिन्या वाचकांवर अन्याय करत असतात. असा प्रकार वृत्तपत्रात सुद्धा होत असतो. परंतु अशा अवाजवी मोठ्या केलेल्या बातम्या टाळून वृत्तपत्र वाचता येते. टीव्ही वरच्या वृत्तवाहिनीवर मात्र तशी सोय नसते. ती बातमी बघणे भागच पडते.
याच तंत्राचा अवलंब करून काही वाहिन्यांनी बातम्यांना पैसे घेण्याचे सत्र सरसकट सुरू केलेले आहे. कित्येक वाहिन्यांचे प्रतिनिधी गावोगाव लोकांना बातमी देण्यासाठी हजारो रुपये मागत असतात आणि ही मागणी उघडपणे केली जाते. यात काही भ्रष्टाचार नाही, हा व्यवहारच आहे, यातले पैसे आम्ही घेत नाही, कंपनीला देतो असे म्हणून काही प्रतिनिधी पैसे घेत असतात. वृत्तपत्रातील पेड न्यूज हा प्रकार मोठा गुन्हा समजला जातो. अर्थात तसा तो समजला जाऊन सुद्धा आणि तो उघडपणे केला जात असून सुद्धा अद्यापही पेड न्यूज घेणाऱ्या एकाही संपादकाला अजून अटक झालेली नाही.
बातमीसाठी पैसे देणारे लोक मुळात पत्रकारांना फार घाबरत असतात. त्यांना प्रसिद्धीची हौस सुद्धा असते. त्यामुळे त्या हौसेपोटी ते बातमीला पैसे देतात आणि तसे पैसे देणे चुकीचे आहे असे त्यांनाही वाटेनासे झाले आहे. एकवेळ हा खुशीचा मामला म्हणून गप्प बसता येईल. परंतु काही पत्रकार बातम्या दडवण्यासाठी पैसे मागतात आणि बातमी दडवणे ज्याच्या हिताचे असते तो बिनदिक्कतपणे पैसे देऊन आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याची सोय करतो. असा प्रकार एखाद्या विशिष्ट भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या बाबतीतच घडतो असे नाही तर पुढारी, अभियंते, कंत्राटदार आणि विविध कार्यालयातले पैसे खाऊ अधिकारी सतत भ्रष्टाचार करत असतात आणि तो उघड होऊ नये म्हणून माध्यमांच्या प्रतिनिधींना कायम बांधून ठेवत असतात.
काही ठिकाणी तर पत्रकारांना काही अधिकाऱ्यानी आणि पोलिसांनी कायम हप्ते बांधलेले आहेत. अशा प्रकारातून वृत्तपत्रांविषयीचा आदर कमी होत आहे. पत्रकारांना पूर्वीसारखा समाजाचे हित साधणारा घटक म्हणून कोणी महत्व देत नाही. पत्रकार सुद्धा आपली ही भूमिका विसरून गेलेले आहेत. त्यामुळे काही अपवाद वगळता लोकशाहीचा हा चौथा स्तंभ पूर्णपणे खिळखिळा झालेला आहे. या घटकाचा भ्रष्टाचारी यंत्रणेवर अंकुश असायला हवा. परंतु तो तर राहिलेला नाहीच पण उलट पत्रकारच स्वतः या यंत्रणेचा एक भाग होऊन अवैध मार्गाने पैसा कमवायला लागले आहेत. त्यातूनच एकंदरीत देशामध्ये पैशाचा सुळसुळाट जास्त झाल्यामुळे पत्रकारांच्या देण्या-घेण्याचे हप्ते सुद्धा वाढलेले आहेत. झी टीव्ही सारख्या प्रतिष्ठीत माध्यमाच्या वरिष्ठ संपादकाला १०० कोटी रुपयांची लाच मागितल्याबद्दल अटक व्हावी ही गोष्ट भ्रष्ट पत्रकारांच्या हप्त्याच्या रकमा सुद्धा कशा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत हे लक्षात येते. समाजाच्या नैतिक आचरणावर या गोष्टीचा गंभीर परिणाम होत असतो.
