स्वातंत्र्याचे रक्षण, तारतम्याचा बळी

 पालघर प्रकरणात दोन तरुणींवर झालेल्या अन्यायाचे प्रकरण एवढे वाढले आहे की सरकारने या तरुणींची मुस्कटदाबी करणार्यार पोलीस अधीक्षकांना निलंबित केले आहे. भारतात  कोणाही नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे किती कसोशीने रक्षण केले जाते आणि एखाद्या नागरिकाच्या या स्वातंत्र्यावर घाला येताच आपली शासन यंत्रणा किती तातडीने कामाला लागते याचे आश्चर्यकारक दर्शन या प्रकरणात झाले आहे.

नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये याबाबत हे सरकार किती जागरूक आहे हे पाहून आजवर जगात या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेले सारे पुण्यात्मे स्वर्गात आनंदाश्रू ढाळत असतील. कदाचित स्वर्गात आनंदाश्रूंचा पूरच आला असेल. पण या स्वातंत्र्याचे रक्षण करताना तारतम्याचा बळी दिला जात आहे. तो पाहून कोणालाही खेदच होईल. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झालेले असताना आणि त्यामुळे झालेले दुःख ताजे असताना, एखाद्या तरुणीने फेसबुकवर त्यांच्या दुखवट्याबद्दल आणि त्यासाठी पाळण्यात आलेल्या बंदबद्दल असे मत व्यक्त करावे हा तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार असेलही. किंबहुना तो आहेच पण तिच्या त्या मतात तथ्यही नाही आणि ते व्यक्त करण्याच्या वेळेत सभ्यताही नाही हे विसरले जात आहे.

एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत जाऊन त्याच्या दुर्गुणाचा पाढा वाचला तर तो भारतीय दंडविधान संहितेच्या कोणत्याच कलमाखाली अपराध ठरत नाही आणि त्यावर गुन्हाही दाखल करता येत नाही. हे कोणी सामान्य माणूसही सांगू शकेल. पण कायदेभंग होत नसला तरी  औचित्यभंग नक्कीच होतो. या मुलीने हा औचित्य भंग तर केला आहेच पण तिने बाळासाहेबांबाबत जे काही म्हटले आहे ते चूकही आहे. अशी किती माणसे जन्माला येतात आणि मरतात. त्यांच्या बद्दल बंद कशाला पाळायचा, असा सवाल तिने केला आहे. हे तिचे म्हणणे कोणीही मान्य करणार नाही. तिचे ते म्हणणे ‘लाईक’ करणारी मुलगी सोडता कोणालाही ते लाईक झालेले नाही. अगदी ते मत व्यक्त करणार्या. त्या शाहीन नावाच्या मुलीनेही आपले मत चुकीचे असल्याचे नंतर मान्य केले आहे.

तिचे म्हणणे चुकीचे की बरोबर हा काही विषय होत नाही पण तिने व्यक्त केलेल्या मताने शिवसैनिक चिडू शकतात की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिवसैनिक चिडू शकतात हे दिसून आले आहे. आताही दिसायला लागले आहे. आजवर आपल्या देशात अशा प्रकरणात कोणाच्याही भावना दुखावल्या की कारवाई झालेली आहे. भावना दुखावणारे वक्तव्य किवा चित्र खरे आहे की खोटे आहे याला महत्त्व दिले गेलेले नाही. एखादे वक्तव्य खरे असले तरीही त्यामुळे भावना दुखावल्या जातात  याला महत्त्व देऊन कारवाई झाली आहे. त्यासाठी कितीतरी उदाहरणे देता येतील.

याही प्रकरणात आता पोलीस अधिकार्यामला निलंबित करण्यात आले आहे. ते अधिकारी आता न्यायालयात धाव घेतील आणि आपले म्हणणे मांडतील तेव्हा हे मुद्दे मांडतीलच. त्यांचे समर्थन करण्याचा आमचा हेतू नाही. त्यांनाही त्यांनी दाखवला त्यापेक्षा अधिक विवेक दाखवून हे प्रकरण हाताळता आले असते. त्यांची कायद्याने चूक झाली आहे हे तर दिसतेच आहे पण त्यांच्यावर सरकारने  जी कारवाई केली आहे ती  पूर्णपणे विवेकाने केलेली आहे असे काही दिसत नाही.

विशेषतः ही कारवाई ज्या तातडीने झाली आहे ती तातडी अनेक शंकांना जन्म देणारी आणि ती करणार्यांीच्या हेतू विषयी संदेह निर्माण करणारी आहे. ही कारवाई कोणाच्या तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली असल्याचे दाखवले जात असले तरीही ते काही खरे नाही. कारण याच लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा किती पुळका आहे हे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. त्यांना नागरिकांच्या स्वातंत्र्याचा खराच उमाळा असता तर त्यांनी तो गेल्याच महिन्यात असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकाराला अटक झाली तेव्हाच दाखवला असता.

पालघरच्या या मुलींना अटक झाली तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे कपिल सिबल असीम त्रिवेदीवर यापेक्षा गंभीर स्वरूपाचा अन्याय झाला तेव्हा एक शब्दही बोलले नाहीत. याच कपिल सिबल यांनी सोनिया गांधी यांची फेसबुकवर व्यंगचित्रे काढणारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. अशा फेसबुकच्या साईटस् ब्लॉक करू असे म्हटले होते. पण आता मात्र   त्यांना त्याचा विसर पडला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे त्यांचे हे ‘निवडक’ समर्थन त्यांच्या ढोंगीपणाचे निदर्शक आहे.