कामातुराणां न भयम न लज्जा

कन्नूर: माणसातील पशुत्वाचे भयावह दर्शन घडविणारी घटना केरळ येथे उघडकीला आली आहे. उमलत्या वयातील १३ वर्षाच्या युवतीवर साक्षात तिचा जन्मदाता बाप, भाऊ आणि काका यांच्याकडून होणारे लैंगिक अत्याचार तब्बल दोन वर्ष मुकाट्याने सहन करावे लागले. मात्र असह्य झाल्यावर तिने आपल्या वेदनेला वाचा फोडली. तिच्या मोठ्या बहिणीने यापूर्वी आत्महत्या केली असून तिनेही अशाच अत्याचारांना कंटाळून आत्महत्या केली काय याचा तपास केरळ पोलीस करीत आहेत.

कन्नूर येथे शाळा सुटल्यावर देखील इयत्ता आठवीत शिकणारी एक विद्यार्थिनी घरी जाण्यास तयार नाही आणि ती सतत हमसून हमसून रडत आहे हे तिच्या शिक्षिकेच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिची आस्थापूर्वक चौकशी केली. काही वेळाने सावरल्यावर त्या मुलीने आपल्यावरील अत्याचाराची कहाणी कथन केली. शिक्षकांनी त्वरित पोलिसांना बोलावून घेतले आणि हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. पोलिसांनी या मुलीचा बाप आणि काकाला अटक केली असून १५ वर्षीय भावाची रवानगी सुधारगृहात केली आहे. अत्याचारित मुलीला बाल विकास केंद्रात पाठविण्यात आले असून तिच्यावर मानसिक उपचार सुरू आहेत.

या प्रकारची चौकशी करतानाच या मुलीच्या मोठ्या बहिणीने दोन वर्षापूर्वी आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळून आले. तिच्या आत्महत्येचे कारण असेच अत्याचार होते; असा पोलिसांचा कयास आहे. केरळ राज्य महिला आयोग तपासावर लक्ष ठेऊन आहे.