भविष्यात खा महाप्रचंड रताळी

आशिया आणि आफ्रिका या खंडातील विकसनशील देश पूरक अन्नपदार्थ म्हणून रताळ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत. त्यामुळे संशोधकांनीही रताळ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल यावर संशोधन सुरू केले आहे. सध्या जगातच हवामान बदलाची चर्चा ऐरणीवर आहे आणि हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनतो आहे. मात्र संशोधकांनी केलेल्या प्रयोगात रताळ्याचे पीक अधिक कार्बन डाय ऑक्साईड असलेल्या हवेत घेतले तेव्हा रताळ्याचा आकार सध्याच्या रताळ्यांच्या दुप्पटीने वाढल्याचे दिसून आले आहे.

हवामान बदलाचा अभ्यास करणार्या् प्रयोगशाळांनी पृथ्वीवर २१०० सालात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण १००० पीपीएम वर जाईल असे भाकित केले आहे. हे लक्षात घेऊन संशोधकांनी कार्बनेच प्रमाण ७६० पीपीएम वर नियंत्रित करून रताळ्याचे पीक घेतले तेव्हा ही रताळी ९६ टक्कयांनी अधिक मोठी झाली असे आढळले. रताळी हे विकसनशील देशातले पाचवे प्रमुख अन्न आहे. आता या महाप्रचंड रताळ्यात पौष्टिक तत्वे किती आहेत यावर संशोधक अभ्यास करत आहेत.

यापूर्वीही कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण सध्याच्या पातळीच्या दुप्पट करून बटाटे, गहू, तांदूळ, बारली यांचे उत्पादन घेण्याचे प्रयेाग करण्यात आले आहेत. तेव्हा पीक उत्पादनात वाढ झाली पण या पिकात प्रथिनांचे प्रमाण १५ टक्कयांनी घटले असे आढळले होते. रताळ्यांच्याबाबत काय होते याची प्रतीक्षा आता करण्यात येत असून हे संशोधन डिसेबरमध्ये अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे होणार्याा जिओफिजिकल युनियन मिटींगमध्ये सादर करण्यात येणार आहे असेही समजते.