बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना !

नवी दिल्ली दि. २६- यंदाच्या नोव्हेंबरमध्ये २४,२५,२६ या तारखांना विशेष मुहूर्त असल्याने दिल्ली, हरयाना, पंजाब, यूपी, राजस्थान,गुजराथ या राज्यात तब्बल तीन दिवसांत दीड लाख विवाह पार पडले असल्याचे समजते. हा आकडा ऐकून सर्वाधिक आनंद झाला आहे तो मनालीतील हॉटेल व्यावसायिकांना. कारण त्यांच्याकडे येणार्याा हनिमून कपल्सच्या प्रचंड संख्येमुळे त्यांचा वर्षाची बेगमी डिसेंबरमध्येच पुरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आजकाल तरूण पिढीत मुलगा मुलगी दोघेही नोकरी व्यवसायत असण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हनिमूनचा विचार करतानाही शनिवार रविवारची सुट्टी, नाताळची सुट्टी आणि नववर्षाची सुट्टी लक्षात घेऊन प्लनिंग केले जात असून २० डिसेंबरनंतर दोन आठवडे मनालीतील नोंदणीकृत हॉटेलांत आत्ताच बुकींग फुल्ल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार वरील तीन दिवसांत एकट्या दिल्लीत २५ हजार विवाह झाले आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्य पर्यटन स्थळ असलेल्या मनालीत ६१० रजिस्टर झालेली हॉटेल्स असून त्यात २००१८ खोल्या आहेत. एरवीही लग्नसीझन मध्ये मनालीला दररोज सरासरी ३०० जोडपी येत असतात. आता ही संख्या आणखी वाढली असून हॉटेल व्यावसायिकांनीही अनेक ऑफर्स, डिस्काऊंट जाहीर करून या नवविवाहितांना आपल्याकडे आकर्षून घेण्याची स्पर्धा चालविली आहे.

मनालीतील चंद्रलोक हॉटेलचे अंकुश भारद्वाज म्हणाले यंदा काश्मीरलाही हनिमून कपल्सची अधिक पसंती आहे मात्र मनालीतील हिमवर्षाव हे नवविवाहितांचे खास आकर्षण असते व त्यामुळे डिसेंबर अखेरीच्या तारखांना हॉटेल्स रिकामी मिळणे कठीण आहे. आत्ताच बरीच हॉटेल्स बुक झाल्याने यंदा हॉटेल व्यावसायिकांना हे वर्ष चांगले जाणार आहे.