बॉलीवूडच्या पुरस्कारात गुणवत्तेला स्थान नाही: अमिताभ

मुंबई: बॉलीवूडमध्ये दिले जाणारे पुरस्कार गुणवत्तेवर नव्हे; तर नातीगोती, हितसंबंध आणि तत्कालीन परिस्थितीवर दिले जातात; अशी टीका बॉलीवूडचे सर्वकालीन ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

आपला अभिनेता पुत्र अभिषेक बच्चन याच्या गुरू या चित्रपटातील अदाकारीची दाखल पुरस्कारासाठी घेतली न गेल्याबद्दल मनात असलेली साल अमिताभ यांनी ट्विट केली. ‘शुक्रवारी रात्री अभिषेक याच्याबरोबर आपण त्याचा गुरू हा चित्रपट पाहीला. त्यातील अभिषेकचा अभिनय बघून आपला ऊर अभिमानाने भरून आला. मात्र या कामगिरीसाठी त्याला कोणताही पुरस्कार न मिळाल्याबद्दल खंत वाटली आणि माझे डोळे पाण्याने डबडबले;’ अशा शब्दात अमिताभ यांनी आपल्या भावनांना वात करून दिली.

बॉलीवूडमध्ये पुरस्कार कोणाला द्यायचा हे गुणवत्ता ठरवीत नाही. नाते संबध आणि त्या त्या वेळेची परिस्थिती ठरविते. मात्र या विषयावर अधिक न बोलणेच बरे! कारण अनेकांना ते परवडणार नाही आणि सहनही होणार नाही; अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.

अभिषेकची समजूत काढण्यासाठी आपण त्याला ‘दिवार’चे उदाहरण दिले. दिवारसाठी मला कोणताही पुरस्कार मिळाला नव्हता. त्याचप्रमाणे दिलीप कुमार यांना गंगा जमुना साठी काहीही नाही. खरे तर गंगा जमुना ही दिलीप कुमार यांची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे माझे मत आहे; असेही अमिताभ यांनी नमूद केले आहे.