मला कोणाकडूनही माहिती घेण्याचा अधिकार- जोशी

नवी दिल्ली:२-जी स्पेक्ट्रम प्रकरणी कॅगचे तत्कालीन महासंचालक आर. पी. सिंग यांनी कॅगवर शरसंधान आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरलीमनोहर जोशी यांच्याकडे अंगुली निर्देश केल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करून जोशी यांच्याकडे खुलासा मागितला. त्यावर ‘लोकलेखा समिती अध्यक्ष या नात्याने मला कोणत्याही अधिकर्‍याकडून माहिती घेण्याचा अधिकार आहे;’ या शब्दात जोशी यांनी प्रतिहल्ला चढविला. सुट्टीच्या दिवशी कॅगचे अधिकारी आपल्याकडे आल्याचा मात्र त्यांनी इन्कार केला.

२-जी स्पेक्ट्रम व्यवहारात देशाचे १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करणारा कॅगचा अहवाल आपल्याला मान्य नव्हता; मात्र नियंत्रक अणि लेखा परिक्षक विनोद राय यांच्या दबावामुळे आपण त्याच्यावर सही केली; असा खळबळजनक खुलासा कॅगचे तत्कालीन महासंचालक आर. पी. सिंह यांनी केला आहे.

२-जी व्यवहाराशी संबंधित अहवाल तयार करताना त्याला अतिरंजित स्वरूप देण्यात आल्याचा आरोप करून सिंह यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की; आपण केलेल्या विश्लेषणावरून प्रथम येईल त्याला प्राधान्याने २-जी परवाने देण्याच्या निर्णयामुळे झालेले नुकसान ३७ हजार कोटी रुपये एवढे आहे. मात्र अंतिम अहवालात हा आकडा फुगवून १ लाख ७६ हजार कोटी एवढा करण्यात आला.

मुरलीमनोहर जोशी यांना २-जी प्रकरणी लोकलेखा समितीचा अहवाल तयार करण्यासाठी केगच्या अधिकार्‍यांनी मदत केली आहे. या प्रकरणी कॅगचा अहवाल तयार होत असतानाच जोशी यांनी या अहवालाची माहिती दूरध्वनीवरून मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही सिंह यांनी केला.

या नवीन वादामुळे २-जी स्पेक्ट्रम प्रकरणातील भाजपचे कारस्थान उघड झाल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे; तर काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी या प्रकरणी जोशी यांनी खुलासा करावा; अशी मागणी केली.