पुणे दि.२० – पुढच्या वर्षात म्हणजेच २०१३ सालात भारतात उन्हाळा तीव्र असेल आणि पावसाचे मान कमीच राहिल व त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळसदृश स्थितीचा सामना भारतीयांना करावा लागेल असे मत जपानी हवामानतज्ञ तोशिओ यामागाटा यांनी व्यक्त केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मेटेरॉलोजीच्या ५१ व्या वर्धापन दिनामिमित्त ते पुण्यात बोलत होते.
तोशियो म्हणाले की, गेले काही वर्षे सात्यत्याने हवामानात बदल होत आहेत. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील हवामान आणि भारतातील पाऊस यांचा संबंध आहे. तो असा की सुमात्रा भाग थंड असेल तर तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते आणि त्यावेळी भारतात चांगला पाऊस होतेा. मात्र सुमात्रातील हवा गरम असेल तर तेथील हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढते व त्यामुळे सुमात्रातच पाऊस अधिक होतो आणि भारतात पाऊस कमी पडतो. यंदा सुमात्राचे हवामान गरम राहील असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. म्हणजेच भारतात पाऊस कमी होईल.
यंदा भारतात मान्सूनचा पाऊस अनिश्चित आणि अनेक भागात कमी पडला आहे. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक अशा अनेक राज्यांना पाऊस कमी पडल्याने आत्तापासूनच पाणी टंचाईचे संकट भेडसावते आहे. पुढच्या वर्षीच्या उन्हाळा तीव्र असेल व त्यामुळे पाणी पातळी आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. पाऊस वेळेवर आला नाही तर पुन्हा एकदा दुष्काळसदृश स्थिती निर्माण होऊ शकते असे मत तोशियो यांनी व्यक्त केले आहे.
जपानच्या योकोहामा इन्स्ंटट्यूट फॉर अर्थ सायन्सच्या अॅप्लीकेशन लॅबोरेटरीचे संचालक असलेल्या तोशियो यांच्यामते गेले दशक हे विषम हवामानाचे ठरले आहे मात्र हा ट्रेंड म्हणता येणार नाही. सध्या जगभरातील समुद्रांच्या तापमानावरच हवामान अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. भारतीय उपखंडातील हवामानाचा अभ्यास केल्यावर भारतात पुढील वर्षात हवामान आणि पाऊसमान कसे असेल याचा अंदाज बांधला गेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.