इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नऊ गडी राखून विजय मिळविला. विजयासाठी ७७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने विरेंद्र सेहवागच्या मोबदल्यात विजय मिळवला. चेतेश्वर पुजाराने दमदार फलंदाजी करताना नाबाद ४१ धावा केल्या तर कोहली १४ धावांवर नाबाद राहिला. भारताने पहिला विजय मिळवीत इंग्लंडमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे.
तत्पूर्वी पाचव्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ४०६ धावांवर संपला. विजयासाठी भारताला केवळ ७७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने भारतासाठी विजयाची संधी निर्माण केली. ओझाने सोमवारी इंग्लंडचे दोन गडी बाद केले. इंग्लंडचा शतकवीर कर्णधार कूक आणि यष्टीरक्षक मॅथ्यू प्रायर यांना त्याने बाद केले. प्रायरचे शतक हुकले, तो ९१ धावांवर बाद झाला. तर कूक १७६ धावा काढून बाद झाला. या दोघांचा अडथळा दूर केल्यानंतर उमेश यादवने स्टूअर्ट ब्रॉडला झटपट बाद केले. त्यानंतर टीम ब्रस्नन आणि ग्रॅहम स्वान यांनी फटकेबाजी करुन इंग्लंडच्या धावा वाढविल्या. अश्विनने ग्रॅहम स्वानचा त्रिफळा उडवनू भारताला यश मिळवून दिले. झहीर खानने टीम ब्रेस्ननला बाद करुन इग्लंडचा डाव संपविला.
आजच्या सामण्यात भारतीय डावाची सुरुवात विरेंद्र सेहवाग आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने केली. दोघांनी अप्रतिम फटकेबाजी करुन भारताला ५७ धावांची सलामी दिली. परंतु, स्वानला षटकार खेचण्याच्या प्रयत्नात सेहवाग बाद झाला. केविन पीटरसनने सीमारेषेवर त्यांचा झेल घेतला. त्याने २५ धावा काढल्या. गंभीर क्षेत्ररक्षणादरम्यान बराच वेळ मैदानावर नव्हता. त्यामुळे पुजाराला बढती देण्यात आली असल्यचे समजते. प्रग्यान ओझा दुस-या डावात चार फलंदाज बाद केले. तर उमेश यादवने तीन तर, झहीर खानने दोन आणि आर. अश्विनने एक बळी घेतला. भारताने पहिला विजय मिळवीत इंग्लंडमध्ये झालेल्या गेल्या वर्षीच्या पराभवाचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे.