इंग्लंड विरुद्ध कसोटी संघ जाहीर

मुंबई: इंग्लंडविरुद्ध होणार्या कसोटी सामन्यांसाठी संदीप पाटील यांच्या निवडसमितीने भारताचा संघ जाहीर केला असून त्यात युवराज सिंह, झहीर खान आणि हरभजन सिंग यांचे पुनरागमन झाले आहे. सुरेश रैनाला मात्र संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन पुन्हा मैदानात उतरलेला युवी एक वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये खोर्याने धावा करणार्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या नव्या दमाच्या फलंदाजांना संधी देऊन सध्या धावा जमविण्यात अपयशी ठरत असलेल्या वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीच्या फलंदाजांना निवडसमितीने जणू इशाराच दिला आहे. या कसोटी मालिकेसाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टया बनविण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आग्रह असल्याने हरभजनला पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुखापतीतून पूर्ण सावरलेला नसतानाही झहीरची करण्यात आलेली निवड त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे.

इंग्लंड बरोबर भारताचा पहिला कसोटी सामना इ. १५ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्यासाठी निवडलेला संघ असा-
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, युवराज सिंग, प्रज्ञान ओझा, इशांत शर्मा, उमेश यादव, वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे,चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, मुरली विजय, विराट कोहली आणि गौतम गंभीर.