काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यापुढे बोलताना राहुल गांधी यांनी आपण जनतेला किती मुर्ख बनवू शकतो आणि तसे बनवताना तारतम्यसुध्दा कसे बाळगत नाही याचे दर्शन घडवले. गेल्या आठ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस पक्ष प्रणित संपु आघाडीने कशी कशी किती किती कामे केली आहेत याचा आढावाही त्यांनी घेतला. कोणताही पुढारी मागचा पुढचा विचार न करता ठोकून देतो ऐसा जे या धाटणीने थापा मारत असतो. हा त्यांचा गुणधर्मच असतो. परंतु तो लोक बर्याकच गोष्टी विसरले असतील याची थोडी तरी काळजी घेत असतो. त्या बाबतीत तो काही तरी पथ्य पाळत असतो. परंतु राहुल गांधी यांना तेवढेही भान राहिले नाही. त्यांनी आपल्या समोर जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष लवकरच लोकपाल विधेयक मंजूर करणार आहे अशी लोणकढी थाप ठोकून दिली. वास्तविक पाहता लोकपाल विधेयकाची चर्चा जवळपास ४२ वर्षांपासून सुरू आहे. ती चर्चा सुरू झाली तेव्हा राहुल गांधीच्या आजी पंतप्रधान होत्या. मात्र त्यांच्या काळात वारंवार चर्चा करून लोकपाल विधेयक पुढे ढकलण्यात आले.
उसने अवसान
त्यांच्यानंतर राहुल गांधीचे पिताजी पंतप्रधान झाले. त्यांनीही लोकपाल विधेयक मंजूर करतो करतो म्हणून लोकांना थापा दिल्या आणि विधेयकाला हरताळ फासून आपण भ्रष्टाचार निर्मूलन करण्यास खरेच किती वचनबध्द आहोत हे दाखवून दिले. त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने पाठिबा दिलेल्या आघाड्या सत्तेवर आल्या पण त्यांनी लोकपाल विधेयकाचे नाव सुध्दा काढले नाही. आता मात्र राहुल गांधी, थांबा आणि पहा, लवकरच लोकपाल विधेयक मंजूर करतो अशी नवी थाप देत आहेत. राहुल गांधींनी ही थाप मारणे यामध्ये प्रचाराशिवाय काहीही नाही. मुळात लोकपाल विधेयक पास करण्याचा अधिकार राहुल गांधींचा नाही. त्यांना लोकपाल विधेयक नेमके काय आहे हे माहीत सुध्दा नाही. देशामध्ये गेल्या दोन वर्षांपासून लोकपाल विधेयकाच्या निमित्ताने एवढा गदारोळ चाललेला आहे. परंतु दोन वर्षात राहुल गांधी यांच्या विविध कारणांनी झालेल्या जाहीर सभांमधून राहुल गांधी यांनी लोकपाल विधेयक या विषयावर एकूण मिळून दहा वाक्ये सुध्दा उच्चारलेली नाहीत. यावरून त्यांना या विषयाची किती माहिती आहे याचे आकलन होते. आता सुध्दा विधेयक नक्की मंजूर करणार अशी थाप ठोकताना त्यांनी या एका वाक्याशिवाय दुसरा शब्दही उच्चारलेला नाही.
ते खरोखर लोकपाल विधेयक आणणार असतील आणि नक्कीच मंजूर करून घेणार असतील तर ते विधेयक कसे असेल, त्या विधेयकाखाली नेमला जाणारा लोकपाल किती समर्थ असेल, त्याच्या अखत्यारीत कोणकोणती खाती असतील आणि कोणती खाती नसतील याचा कसलाही उहापोह त्यांनी केलेला नाही. राहुल गांधी यांच्या या असल्या पोरकट भाषणांचे प्रदर्शन उत्तर प्रदेशात झालेले आहे. ते पुढे चालून पंतप्रधान होणार आहेत असे त्यांचे चेले चपाटे आणि दिग्विजयसिंग यांच्यासारखे चमचे नेहमीच बोलत असतात. परंतु हा उद्याचा पंतप्रधान इतके उथळ भाषण करत असतो की त्याच्या भाषणाने कोणी प्रभावितसुध्दा होत नाही. पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असणारी विद्वत्ता, जगाची माहिती, सामान्य जनतेच्या प्रश्नांचे आकलन आणि त्या प्रश्नांची मांडणी करण्याचे कसब त्याचबरोबर ते प्रश्न सोडविण्यासाठी करावयाचे प्रयत्न याचा कसलाही मागमूस राहुल गांधींच्या भाषणात नसतो. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा कसा सफाया झाला हे सर्वांना माहीत आहे. जनतेच्या हृदयाला हात घालणारा नेता होण्यासाठी समाजाच्या प्रश्नाविषयी तळमळ सुध्दा असावी लागते. पण तिचाही थांगपत्ता राहुल गांधी यांच्या भाषणात, बोलण्यात आणि वागण्यात लागत नाही.
आपल्या पक्षाने फार मोठे काम केलेले आहे, आपण गरिबांसाठी खूप काही करणार आहोत, आपला पक्ष गांधी, नेहरूंची धोरणे पुढे चालवत आहेत. अशी लिहून आणलेली चार वाक्ये आणि विरोधी पक्षांवर झाडलेल्या चार दुगाण्या या पलिकडे त्यांच्या भाषणात काही नसते आणि असण्याची शक्यताही नाही. कारण या सगळ्या गोष्टी येण्यासाठी नेता सामाजिक आणि राजकीय चळवळीतून पुढे यावा लागतो त्याच्या मनाची आणि मेंदूची मशागत एखाद्या विशिष्ट विचाराच्या शिबिरातून आणि प्रशिक्षण वर्गातून व्हावी लागते. गरिबांचे जीवन जवळून बघितलेले असावे लागते आणि त्याची जाणीव मनामध्ये असावी लागते.
परंतु या कोणत्याही गोष्टीशिवाय केवळ गांधी घराण्यात जन्म घेणे या एका गोष्टीवर राहुल गांधी देशाचा पंतप्रधान व्हायला निघालेले आहेत आणि काही उपद्व्यापी लोकांनी लिहून दिलेली भाषणे वाचून विद्वत्तेचा आव आणत आहेत. त्यांना कोणत्याही एखाद्या साध्या पत्रकाराने एक साधा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येत नाही. म्हणून ते कधीही पत्रकार परिषदेला सामोरे जात नाहीत आणि आता केवळ समोर एक सभा आहे म्हणून लोकपाल विधेयकाच्या गोष्टी बोलायला लागले आहेत यापरती हास्यास्पद कोणती असू शकेल?
