नवी दिल्ली: बांगलादेशमधून अवैध घुसखोरीला काही प्रमाणात आळा बसला असला तरीही घुसखोरी सुरूच असल्याचे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे बांगलादेशच्या विरोधी पक्ष नेत्या खालिदा जिया दिल्ली दौर्यावर असतानाच नवी दिल्लीत झालेल्या वार्तालापात गोगोई यांनी ही स्पष्टोक्ती केली आहे.
आसाममध्ये सन १९९१ पासून घुसखोरीचे प्रमाण घाटात आहे. मात्र अजूनही घुसखोरी सुरूच आहे हे नाकारता येणार नाही; असे गोगोई यांनी सांगितले. घुसखोरीच्या संख्येबाबत राज्य सरकार आकडे फुगवूनही सांगत नाही किंवा मुद्दाम कमी करून सांगत नाही; असेही त्यांनी नमूद केले.
घुसखोरी आएतच असली तरीही घुसखोरीच्या नावाखाली भारतीयांनाच त्रास देण्याचे उद्योग केले जाऊ नयेत; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आसाममधील १२ उग्रवादी संघटनांमधील केवळ उल्फा वगळता इतर सर्व संघटना शांततापूर्ण वाटाघाटी करण्यास तयार आहेत असेही गोगोई यांनी सांगितले.
आसाममध्ये बोडो आणि मुस्लीम समाजात उसळलेल्या हिंसाचारात ९७ जण मारले गेले तर ४ लाख८४ हजार जण बेघर झाले. त्यापैकी ४ लाख ३ हजार जणांचे पुनर्वसन करण्यात आल्याचेही गोगोई यांनी स्पष्ट केले.