अपहरणाबाबत बाबा रामदेव यांच्या चौकशीची शक्यता

हरिद्वार: योगगुरू बाबा रामदेव यांच्या विरुद्ध चौकशीचे फास उत्तराखंड सरकारने आवळायला सुरुवात केली आहे. बाबांचे गुरू स्वामी शंकरदेव बेपत्ता असल्याच्या तक्रारीचे रुपांतर अपहरणाच्या तक्रारीत करण्यात आले असून आवश्यकता वाटल्यास बाबांसह त्यांचे सहयोगी आचार्य बाळकृष्ण यांची चौकशी करण्यात येईल; असे उत्तराखंड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

स्वामी शंकरदेव १४ जुलई २००७ पासून कनखल येथील कृपाळूबाग आश्रमातून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे शिष्य बाळकृष्ण यांनी दि. १६ जुलाई रोजी पोलिसांकडे केली. याचा तपास उत्तराखंड राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. सीआयडीने या प्रकरणी तपास करून एप्रिल २०१२ रोजी अहवाल सादरही केला. मात्र राज्य सरकारने हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला. हा तपास अद्याप सुरू झालेला नाही.

दरम्यान; शनिवारी अचानक या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून शनिवारी उत्तराखंडचे पोलीस महासंचालक सत्यव्रत बन्सल यांच्या आदेशानुसार कनखल पोलीस ठाण्यातील हे प्रकरण अपहरणाचे असल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.