संयुक्त राष्ट्र: संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सुरक्षा समितीची सध्याची रचना कालबाह्य झाली असून तिची पुनर्रचना आणि विस्तार आवश्यक असल्याचे मत भारताने व्यक्त केले आहे. मागील काही काळात अत्यंत निकडीच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यात सुरक्षा समितीला अपयश आल्याचेही भारताच्या प्रतिनिधीने नमूद केले आहे.
भारताचे सुरक्षा परिषदेतील सदस्यत्व संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेत भारताने सुरक्षा समितीचा विस्तार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. सध्याच्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सुरक्षा परिषद अक्षम ठरत असून तिचा विस्तार करणे आवश्यक आहे. या विस्तारामध्ये आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकन देशांना प्रतिनिधित्व द्यावे; अशी मागणी भारताचे प्रतिनिधी हरदीपसिंग पुरी यांनी केली आहे.
सिरीयासारख्या कळीच्या प्रश्नावरही सुरक्षा परिषदेत मतभेद आहेत; याकडे लक्ष वेधून सुरक्षा परिषदेत अशा प्रश्नांवर सर्वसहमती घडवून आणण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली.