लखनौ दि.३ – उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या जनक्रांती पक्षाचे नेते कल्याणसिंग पुन्हा भाजपच्या वाटेवर असून त्यांच्या पुनरागमनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे वृत्त आहे. अर्थात पक्षात पुन्हा परतताना कल्याण सिंग यांनी आपल्या सर्व अटी पक्षश्रेष्ठींना मान्य करायला लावल्या असल्याचेही समजते. कल्याणसिंग भाजपमधून बाहेर पडले तेव्हा ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते तेच पद त्यांना पुन्हा बहाल करण्यात येणार आहे. २०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणूकात सॅफ्रॉन ब्रिगेडसाठी कल्याण सिंग पक्ष इमेज सुधारण्याची मोठी भूमिका निभावतील असेही पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कल्याणसिंग पुन्हा भाजपाच्या वाटेवर
कल्याण सिंग यांना पुन्हा भाजपामध्ये आणण्याचे प्रयत्न गेले कांही दिवस सातत्याने सुरू आहेत.२००९ साली कल्याण सिंग पक्षातून बाहेर पडले व त्यांनी नवा पक्ष स्थापन केला. आता भाजपमध्ये परतताना त्यांनी मुलगा राजवीर सिंग यांच्यासाठी राज्य भाजपामध्ये महत्त्वाचे पद तसेच लोकसभेसाठी उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे आणि जन क्रांती पक्षातील नेत्यांसाठीही मोठा वाटा मागितला आहे. त्याचबरोबर पक्षात सर्व जाती, धर्म, पंथांना समान वागणूक आणि समान संधी मिळाली पाहिजे असेही कबूल करून घेतले आहे असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, राजनाथ सिंग, लालजी टंडन आणि बलराज मिश्र यांची याबाबत नुकतीच बैठक झाली असून या बैठकीला मुरली मनोहर जोशीही उपस्थित होते. कल्याण सिंग यांच्या पुनरागमनाची तारीख गडकरी जाहीर करणार असून त्यादिवशी लखनौ मध्ये या दोन पक्षांच्या विलीनीकरणानिमित्त मोठा समारंभही साजरा केला जाणार आहे.
२००९ सालच्या निवडणुकांत अशोक प्रधान यांना बुलंदशहर मधून उमेदवारी दिली जाऊ नये असा कल्याणसिंग यांचा आग्रह होता. राजवीरसिंग यांच्या पराभवास अशोक प्रधान कारणीभूत असल्याचाही त्यांनी आरोप केला होता मात्र भाजपने त्यांची विनंती मान्य न केल्याने ते पक्षातून बाहेर पडले होते आणि भाजपचे तिकीट मिळूनही त्यांनी अपक्ष म्हणून ती निवडणूक लढविली होती. गेली तीन वर्षे दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची गरज वाटत होती व त्यातूनच प्रथम लालजी टंडन यांनी कल्याणसिगांची भेट घेतली होती.
