मुंबई दि.२ – भारत पाक क्रिकेट मालिका भारतात खेळविण्याबाबत सुरवातीपासून असलेली विरोधाची धार अधिक कडक करतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा दौरा राष्ट्रासाठी शरमेची बाब असल्याचे विधान केले आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या दौर्यााला हिरवा कंदिल देऊन त्यांची सेवा पाकिस्तान चरणी रूजू केल्याची टीका केली. पार्लमेंटवरील हल्ला, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला या पाकिस्तानच्या सहाय्याने झालेल्या आक्रमणानंतरही पाकिस्तानला देशात खेळू देणे म्हणजे या हल्ल्यात जिवाची बाजी लावलेल्या हुतात्म्यांचा अपमान असल्याचेही ठाकरे म्हणतात.
पाकिस्तानचा संघ २५ डिसेंबरपासून भारतात कांही सामने खेळणार आहे. हे सामने बंगळूर, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे होणार आहेत. या शहरांवरही पाकिस्तानच्या सहायाने दहशतवाद्यांनी या ना त्या कारणाने हल्ले झाले असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राला पाकिस्तानी खेळाडूंचे पाय लागणार नाहीत ही समाधानाची बाब असली तरी सामने होणार्याा शहरांना त्यांचे पाय लागणे हीही राष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. बीबीसीआय देशाची फसवणूक करत असून पैशासाठी ते असले उद्योग करत आहेत आणि विशेष म्हणजे आमचे खेळाडूही त्याचाच एक भाग बनले आहेत हे दुर्देव आहे अशीही कडक टिप्पणी त्यांनी केली.
कपिल देव आणि सुनील गावस्कर या दोनच खेळाडूंनी पाकिस्तान भारत सामने भारतात होण्यास विरोध केला होता असेही बाळासाहेब म्हणाले. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पूर्वीपासूनच या भारत पाक सामने भारतात होण्यास विरोध केला असून तो आजही कायम असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.