लखनौ दि.२ – २०१४ साली होत असलेल्या लोकसभा निवडणूका पार पडेपर्यंत काँग्रेस नेत्यांना सुखाची झोप घेऊ देणार नाही असा इशारा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सभेत बोलताना दिला. काँग्रेसचे मंत्री सलमान खुर्शीद यांच्या फारूखाबाद मतदारसंघात सभा घेताना ते बोलत होते.
खुर्शीद यांच्या झाकीर हुसेन ट्रस्टने अपंगांसाठीचा निधी लाटल्याचा आरोप केजरीवाल यांनी केल्यानंतर खुर्शीद यांनी त्यांना फारूखाबादेत येऊन परत जाऊन दाखवावे असे आव्हान दिले होते. ते स्वीकारून काल केजरीवाल यांनी येथे सभा घेतली. सभास्थानी येईपर्यंत त्यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखविले गेले तर कित्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.
केजरीवाल म्हणाले की आम्ही राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यापासूनच काँग्रेसची झोप उडाली आहे. मात्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास त्यांनीच आम्हाला भाग पाडले. जेव्हा जेव्हा आम्ही जनलोकपाल विधेयक पास करण्याची मागणी केली तेव्हा तेव्हा त्यांनी राजकारणात उतरा, निवडणूका लढवा आणि बिल पास करून घ्या असे आम्हाला सांगितले. आता आम्ही राजकारणात उतरलो आहोत. काँग्रेसला राजकारणाचे धडे आम्हीच शिकवू. २०१४ साली होणार्यात निवडणूकांत काँग्रेसला नेस्तनाबूत करेपर्यंत आम्ही उसंत घेणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.