मुंबई दि.१ – पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरवाढीपाठोपाठ आता सीएनजीच्या किमतीतही किलोमागे ८५ पैसे वाढ करण्यात आली असून ही दरवाढ बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. मुंबईत आता सीएनजीची किमत ३३.९५ पैसे किलो अशी झाली आहे.
सीएनजीच्या किमती वाढल्या
सीएनजी दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. कारण पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर टॅक्सी, रिक्षा, कॅबची भाडेवाढ होते. मुंबईत अनेक टॅकसी, रिक्षा, कॅब व बेस्टच्या बसेस सीएनजीवर धावतात. त्यामुळे त्यांचीही आता भाडेवाढ होणार ही भीती नागरिकांत आहे. अर्थात वाहतून विभाग आयुक्तांनी मे २०१३ पर्यंत भाडेवाढ मंजूर केली जाणार नाही असे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने वर्षातून एकदाच भाडेवाढ करण्याचा ठराव नुकताच पास केला आहे.
टॅक्सी रिक्षा युनियन सीएनजी दरवाढीमुळे नाराज झाले आहेत. टॅक्सी युनियनच्या मते रिक्षाला ३ रूपये भाडेवाढ दिली तेव्हा टॅक्सीसाठी दोन रूपये वाढ दिली गेली. आता सीएनजी दर वाढले म्हणजे टॅकसीचालकांना १ रूपया प्रत्येक किलोसाठी जादा खर्चावा लागणार आहे. बेस्टच्या ५० टक्के गाड्या सीएनजीवर चालतात तर बाकी डिझेलवर चालतात. डिझेलची दरवाढ झाल्यानंतर बेस्टने एप्रिलपासून १ रूपया भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे या अगोदरच जाहीर केले होते आता सीएनजी दरवाढीनंतर ही भाडेवाढ दोन रूपये करण्यात येईल असा तर्क व्यक्त केला जात आहे.
