
मुंबई,३१ ऑक्टोबर-युवराज सिंग सुरेश रैनाचे स्फूर्तीस्थान आहे. युवीची आव्हानांना मात करण्याची जिद्द असो किंवा सहा षटकार मारण्याचा पराक्रम सगळेच धडाकेबाज. अशा युवराजचा रैना चाहता आहे, पण हाच युवी त्याच्यासमोर आता स्पर्धक म्हणून उभा ठाकला आहे. भारताच्या कसोटी संघातील सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी एक जागा शिल्लक आहे आणि त्यासाठी चुरस आहे ती रैना व युवीमध्ये. अर्थात ही स्पर्धा निकोप असून निवड समिती घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे रैनाने सांगितले.
’एका मोठ्या आजारावर मात करीत युवराजने यशस्वी पुनरागमन केले आहे. तो माझ्यासारख्या अनेक तरुण खेळाडूंसाठी आदर्श आहे. भारताची कसोटी कॅप परीधान करून खेळणारा युवी बघायला मलाही आवडेल. इंग्लंडविरुद्धच्या चारही कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला मलाही आवडेलच ; पण अंतिम निर्णय निवड समितीचा असेल’, असे रैनाने सांगितले.
इंग्लंडलाही व्हाईटवॉश द्यायचाय…
इंग्लंडने त्यांच्या मायदेशात केलेल्या ०-४ अशा मानहानीकारक पराभवाच्या आठवणी सुरेश रैनाच्या मनात अजूनही ताज्या आहेत. इंग्लिश संघाला कसोटीत व्हाइटवॉश देत तशाच दुःखाचा अनुभव देण्याचा रैनाचा इरादा आहे. पुढील महिन्यात अहमदाबाद कसोटीपासून भारत-इंग्लंड यांच्यातील चार कसोटींच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
