नवी दिल्ली दि.२६- भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आयकर विभागाकडून करण्यात येत असलेली चौकशी ही निव्वळ जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. काँग्रेस आणि भाजप हे याबाबत भाईभाईच आहेत असे भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन कार्यकर्ते आणि आता राजकारणात उतरलेले माजी सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल स्वतः माजी आयकर अधिकारी आहेत. सोनियांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्यानंतर दुसरे टार्गेट म्हणून त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांची उद्योगातील गैरव्यवहार आणि बेनामी कंपन्यांची प्रकरणे बाहेर काढली आहेत. त्यावर यासंबंधात आयकर विभाग चौकशी करेल असे सरकारने जाहीर केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल म्हणतात की सरकार खरोखरच अशी चौकशी करणार आहे का? कारण असल्या घोषणा करून सरकार जनतेला मूर्ख बनविते आहे.
आयकर विभागाला मुळातच अशी चौकशी करण्याचे अधिकार नाहीत. आयकर कायद्यानुसार हा विभाग रेड टाकू शकतो, स्क्रुटिनी करू शकतो किवा सर्वेक्षण करू शकतो. रेड टाकताना गुप्तता पाळावी लागते. नितीन गडकरी यांच्या पूर्ती पॉवर व शुगर उद्योग व अन्य १८ कंपन्यातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे अधिकार आयकर विभागाला नाहीत. मग सरकारने अशी घोषणा करून काय साध्य केले ? याचाच अर्थ काँग्रेस आणि भाजप भाई-भाई आहेत.