पवित्र गंगेचे पाणी होतेय जीवघेणे

कोलकाता: भारतीयांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या गंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असून या प्रदूषित पाण्यामुळे कर्करोगाचा धोका वाढला असल्याची धक्कादायक बाब संशोधनात दिसून आली आहे.

राष्ट्रीय कर्करोग संशोधन कार्यक्रमांतर्गत केलेल्या संशोधनानुसार गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर घातक क्षार आणि विषारी रसायनांचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. या प्रदूषित पाण्याच्या वापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.

उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या पाण्याचे प्रदूषण तुलनेने अधिक प्रमाणात होत असून या भागात कर्करोगाची भीती अधिक आहे. सध्याही या भागात दूषित पाण्यामुळे किडनी, अन्ननलिका, आतडे आणि त्वचेच्या विकाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे; असे अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे.