विजय तो विजयच?

देशात झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला धक्के बसलेले आहेत. त्यातल्या उत्तरांचलातल्या टिहरी लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा मुलगा २२ हजार मतांनी पराभूत झालेला आहे. मुख्यमंत्री एखादी जागा रिकामी करतात, तेव्हा होणारी पोटनिवडणूक किंवा मुख्यमंत्री विधानसभेवर यावेत म्हणून घेतली जाणारी पोटनिवडणूक होते तेव्हा सत्ताधारी पक्षाचा पराभव होत नाही. कारण तेवढ्याच एका जागेवर विरोधी उमेदवार निवडून दिल्याने राज्याच्या बहुमताच्या चित्रावर काही परिणाम होत नाही आणि एकप्रकारे अशा पोटनिवडणुकात होत असलेल्या मतदारसंघातील मतदार आपण मुख्यमंत्र्यांना मत देत आहोत, आपण मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मत देत आहोत या चांगल्या भावनेने त्यांना मत देत असतात. अशी एखादी पोटनिवडणूक सत्ताधारी पक्षाने गमावली असल्याचे चित्र कधी बघायला मिळालेले नाही. उत्तरांचलात मात्र ते घडलेले आहे आणि ज्या मतदारसंघात २००९ साली भाजपाचा उमेदवार प्रचंड बहुमताने पराभूत झाला होता, त्याच भाजपाच्या उमेदवार माला राज्यलक्ष्मी शहा या २२ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. काँग्रेससाठी हा धक्का आहे.

काँग्रेसचे नेते या पराभवाला काही महत्व नाही, असे कितीही म्हणत असले तरी त्यांच्यासाठी हा धक्का आहेच. कारण याच राज्यात काँग्रेसने भाजपाची सत्ता हिसकावलेली आहे. अशा प्रसंगात तरी काँग्रेसचा एवढा दारूण पराभव व्हायला नको होता. परंतु जनताच काँग्रेसवर चिडलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या गोटात त्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले असल्यास काही नवल नाही. काँग्रेसच्या नेत्यांना टिहरीमध्ये पराभव झाला असून सुद्धा त्याची क्षिती नाही. तेव्हा प्रणव मुखर्जी यांच्या जांगीपूर मतदारसंघात निसटता विजय झाला. याची तरी क्षिती कशाला असेल? तिथे प्रणवदांचे चिरंजीव अभिजीत हे केवळ २ हजार २०० मतांनी विजयी झाले आहेत. ही जागा प्रणव मुखर्जी यांनी २००९ साली १ लाख २८ हजार मतांच्या अधिक्याने जिकली होती. परंतु त्यांच्या चिरंजीवांना तेवढे मताधिक्य मिळाले नाही. आपल्या मतदारसंघाचा खासदार राष्ट्रपती झाला याचा अभिमान वाटून या लोकांनी त्यांच्या चिरंजीवाला भरभरून मते द्यायला हवी होती. परंतु तसे झाले नाही आणि हे चिरंजीव पडता पडता बचावले. डाव्या आघाडीच्या उमेदवाराने त्यांना कडवी झुंज दिली.

आपले मताधिक्य १ लाख २६ हजारांनी कमी झाले आहे हा त्यांच्यासाठी काळजीचा विषय व्हायला हवा होता. परंतु ते चिरंजीव भलतेच बेफिकीर आहेत. दोन हजारांनी विजय झाला असला तरी शेवटी तो विजयच आहे, असे म्हणून त्यांनी मोठ्या जल्लोषात मिठाई वाटली आहे. या जांगीपूर मतदारसंघात दोन गोष्टी नव्याने घडल्या आहेत. त्या म्हणजे काँग्रेसचे बळ कमी झाले आहे. महागाई, भ्रष्टाचार याच्यामुळे काँग्रेसची अवनती झाली आहे हे तर खरेच आहे. परंतु यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला तृणमूल काँग्रेसची साथ मिळालेली नाही. २००९ साली या दोन पक्षांची युती होती, ती आता मोडली आहे. त्याचाही फटका प्रणवदांच्या चिरंजीवांना बसला आहे. 

तृणमूल काँग्रेसची मते काँग्रेसला मिळाली नाहीत. परंतु ती तिथल्या डाव्या आघाडीच्या उमेदवारालाही मिळालेली नाही. त्या मतांचा मोठा हिस्सा तिथे उभ्या असलेल्या भाजपाच्या उमेदवाराच्या पदरात पडलेला आहे. २००९ साली सुद्धा तिथे भाजपाचा उमेदवार होता. पण त्याला त्यावेळी केवळ १६ हजार मते मिळालेली होती. यावेळी मात्र त्याने ८५ हजार मते मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. भारतीय जनता पार्टी हा उत्तरेतल्या आणि पश्चिमेच्या राज्यातला पक्ष आहे असे म्हटले जाते. तामिळनाडू, केरळ, आंध्र आणि पश्चिम बंगाल या राज्यात भाजपाला स्थानच नाही. पण असे असूनही पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी हा तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो हे आता दिसून आले आहे.

केंद्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसची प्रतिमा मलीन झालेली आहे आणि काँग्रेसचे सरकार हटवले पाहिजे, असे लोकांना वाटत आहे. निदान माध्यमांचा आणि भारतीय जनता पार्टीचा तरी तसा दावा आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला सातत्याने पाण्यात पाहणारे काही लोक वेगळे विश्लेषण मांडत असतात. सध्याच्या वातावरणाचा फटका काँग्रेसला बसणार असला तरी त्याचा फायदा भाजपाला होणार नाही, असे या लोकांचे म्हणणे असते. काँग्रेस भ्रष्ट आहे, पण भारतीय जनता पार्टी सुद्धा भ्रष्टच आहे, या दोन पक्षात काही फरक नाही. त्यामुळे लोक काँग्रेसला डावलून भाजपाला निवडणार नाहीत, असे या लोकांचे भाकित असते. मात्र जांगीपूर आणि टिहरी या दोन मतदारसंघाच्या निवडणुका काही वेगळा संकेत देत आहेत. 

भाजपाला फायदा होणार नाही असे विश्लेषण मांडणार्‍यांना ही गोष्ट आवडो की न आवडो परंतु भारतीय जनता पार्टी हाही पक्ष काँग्रेस सारखाच भ्रष्ट आहे हा या लोकांचा आवडता सिद्धांत लोकांना पटलेला नाही आणि काँग्रेसची गेलेली जागा भाजपाच भरून काढणार आहे. निदान या दोन निवडणुकांत तरी तसा संकेत मिळालेला आहे.