अयोध्या: रामजन्मभूमी, बाबरी मस्जिद विवादावरील सर्वमान्य तोडगा दृष्टीपथात आला आहे. या प्रस्तावानुसार वादग्रस्त परिसरात राममंदिर, मस्जिद आणि उद्यान विकसित करण्यावर सहमती झाली आहे. स्थानिक नागरिक, राज्य शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
अयोध्या विवादावर तोडगा काढण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत न्यायमूर्ती पलक बसू यांच्या पुढाकाराने रसिकपीठ जानकीघाट बडा आखाडाचे महंत जन्मेजय शरण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत रामलल्लाच्या म्हणजेच गर्भगृहाच्या जागी राममंदिर उभारणे, न्यायालयाने रिसिव्हरच्या नियंत्रणात ठेवलेल्या युसूफ आरामशीनच्या परिसरातील जागा मशिदीसाठी देणे आणि वादग्रस्त जागेच्या दक्षिणेकडील भागात उद्यान विकसित करणे; असा सर्वमान्य प्रस्ताव या बैठकीत संमत करण्यात आला.
या प्रस्तावाबाबत अयोध्या फैजाबाद येथील नागरिकांची सहमती निर्माण केली जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. त्याचप्रमाणे न्यायालयाचे रिसिव्हर यांची या प्रस्तावास परवानगी घेण्यात येईल. राज्यशासनामार्फत हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवून त्याला अंतिम मान्यता घेण्यात येईल.