‘ऑपरेशन तबाही’चा पर्दाफाश

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या दहशतवाद्यांनी तोंड उघडले असून दिल्ली आणि बिहार मधील बुद्ध गया या ठिकाणी ‘ऑपरेशन तबाही’ अंतर्गत मोठ्या घातपाती कृत्यांचा कट इंडियन मुजाहिदीनने आखल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

म्यानमार येथे मागील काही काळात झालेल्या हिंसाचारात मुस्लीम बांधवांच्या मोठ्या प्रमाणात हत्या झाल्याचा सूड उगविण्यासाठी मुजाहिदीनचे म्होरके रियाझ आणि इक्बाल या भटकळ बंधूंनी बिहारमधील गया येथे जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता; अशी माहिती अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी दिली आहे. या ‘तबाही’ला अंजाम देण्याची जबाबदारी पुणे साखळी बॉम्बस्फोटातील संशयित आणि दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलेला दहशतवादी असद खान याच्यावर देण्यात आली होती. या ऑपरेशनमध्ये गुप्तता राखण्याच्या दृष्टीने असदला ‘काका’ असे नाव देण्यात आले. भटकळ बंधूकडून संवाद अथवा निरोपाच्या देवाण घेवाणीत असदला काका म्हणूनच संबोधण्यात येत असे. त्याला या ऑपरेशनमध्ये मदत करण्यासाठीच पुणे बॉम्बस्फोटातील इतर दोघे इम्रान खान आणि सैय्यद फिरोज उर्फ हमजा हे दिल्लीत पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे बॉम्बस्फोटातील असदचे सहकारी शाकीर आणि अहमद यांच्याबरोबरच त्यांचा दिल्लीस्थित सहकारी राजूभाई यांच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी ठिकठीकाणी छापासत्र सुरू केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा, गुप्तचर विभाग आणि पुणे दहशतवाद प्रतिबंधक विभागाची पथकेही दिल्लीत दाखल झाली आहेत.