नवी दिल्ली दि.१३ – भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा अण्णा हजारे यांचा फोन गेले कांही महिने सातत्याने टॅप केला जात असून त्यामुळे फोनवरून काही विशेष चर्चा करायची असेल तर अण्णांना त्यांच्या सहकार्यांचे फोन वापरणे भाग पडत आहे अशी बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. आजही देशातल्या विविध राज्यात १० हजारांपेक्षा अधिक फोन कायदेशीर रित्या टॅप केले जात असल्याची माहिती उच्च स्तरीय समितीतील सदस्यांकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृह सचिवांकडून जे नंबर टॅप करण्याची परवानगी मागितलेली असेल त्याचा आढावा ही समिती घेत असते. कॅबिनेट सचिव अजित सेठ, टेलिकॉम सचिव आर.चंद्रशेखर व कायदा सचिव बी.ए. आगरवाल या समितीचे अन्य सदस्य आहेत.
या समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार एकट्या ऑगस्ट महिन्यात पाच हजार फोन टॅप करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विविध गुप्तचर संस्था, पोलिस विभाग तसेच लष्कराकडून अशा परवानग्या मागितल्या जातात. फोन शिवाय १२०० ईमेल अॅड्रेसही इंडियन टेलिग्राफ अॅक्टनुसार मॉनिटर केले जात असतात असेही सांगण्यात आले आहे. वरील तीन सचिवांची नुकतीच दिल्लीत बैठक झाली असून त्यातआणखी ५५९ ईमेल मॉनिटर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
इंटेलिजन्स ब्युरो ६००० फोन टॅप करत असून त्यांनी आणखी २१०० फोन टॅप करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. दिल्ली पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात असे ७३८ विनंती अर्ज दाखल केले होते. आर्मी सिग्नल गुप्तवार्ता यंत्रणा ११०० फोन टॅप करत असून आणखी ५५७ टॅपिंग विनंती अर्ज त्यांनी दाखल केले आहेत. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सही १६०फोन कनेक्शनवर नजर ठेवून आहे आणि त्यांनी ३५०विनंती अर्ज दाखल केले आहेत. समितीने १७ टॅपिंग विनंती अर्ज फेटाळलेही असल्याचे सांगण्यात येत आहे.