लंडन – एखाद्या जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या हातांचे ठसे किती काळ टिकून राहतात? एका अदभुत घटनेमुळे याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. अमेरिकन नागरिक हँस गलासी यांनी ब्रिटनमध्ये एका दुर्घटनेत आपल्या हाताची बोटे गमावली. त्यातील एक बोट एका माशाच्या पोटात सापडले असून, त्या बोटाच्या ठशावरुन त्याची ओळख पटली आहे. त्यामुळे सहाजिकच हा प्रश्न निर्माण झाला आहे की हाताचे ठसे किती काळ टिकतात?
बोटे गमावली तरी ’ठसा’ उमटविला!
तज्ञांच्या मते प्रत्येकाचे आपले असे खास वैशिष्ट्ये असणारे हे हातांचे ठसे असतात आणि हे ठसे कधीच पुसले जाऊ शकत नाही. एखादे कठीण काम करताना देखील हाताचे ठसे नष्ट होऊ शकत नाहीत. जसे विटा बनविण्याचे काम, बांधकामाची कामे, भांडी घासणे अशी कामे करताना काही दिवसांसाठी ठसे नष्ट झाल्यासारखे वाटले तरी ते पूर्ववत होतात.
१९३० च्या दशकातील अमेरिकेतील कुख्यात गुंड जॉन डिलिंजर याने तर आपल्या हातांचे ठसे नाहीसे करण्यासाठी अॅसीडचा वापर देखील केला होता. परंतु काही दिवसांतच त्याच्या हाताचे ठसे पूर्ववत झाले. तसेच रॉबर्ट फिलिप्स नावाच्या एका गुन्हेगाराने प्लास्टिक सर्जरीद्वारे हाताचे ठसे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही, अशी माहिती हाताच्या ठशांचे तज्ज्ञ ब्रिटनमधील पोलिस अधिकारी ऍलन बायली यांनी दिली.
गलासी यांच्या बाबतीत माशाने त्याचे बोट गिळल्यानंतर वरची त्वचा नष्ट झाली असावी पण या फ्रिक्शन रिजेस मुळे त्यांचा बोटाची ओळख पटली असावी असेही बायली म्हणाले. याशिवाय आपली त्वचा पाण्यात राहिल्यास सडते, परंतु पाण्याचे तापमान हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच जर पाण्याचे तापमान कमी असेल तर मानवी त्वचा लगेच खराब होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
तरीदेखील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माशाने गिळलेले बोट त्याला पचले कसे नाही. शिवाय या दुर्घटनेनंतर किती वेळाने माशाने ते बोट गिळले याबाबातही माहिती मिळू शकलेली नाही. बायली यांच्यामते माशाने गिळलेल्या बोटाची वरची त्वचा जरी पचली असेल तरी फ्रिक्शन रिजेस मुळे त्याची ओळख पटण्यास मदत झाली असावी. त्यांच्या मते मृत्यू नंतरही अनेक काळ टिकून राहणार्या मानवी अवशेषांपैकी हाताचे ठसे हा एक भाग आहे.
