जागतिक मंदीच्या बातम्या सर्वत्र चर्चेला आल्या की, भारताचा माहिती तंत्रज्ञानाचा धंदा उतरणीला लागणार असे सरसकट बोलले जाते. अमेरिकेला आणि यूरोप खंडाला गेली पाच वर्षे मंदीचे झटके बसत आहेत. त्यामुळे भारतातला आय.टी उद्योग उतरणीला लागला आहे, अशा वदंता पसरवल्या जातात. प्रत्यक्षात भारतातला हा उद्योग प्रचंड वेगाने वाढत आहे. २०११ साली प्रसिद्ध झालेल्या जागतिक पाहणीच्या अहवालामध्ये आऊटसोर्सिंगच्या व्यवसायात भारताचा पहिल्या दहा देशांमध्ये पहिला क्रमांक असल्याचे दिसून आले आहे. जोन्स लँग ला सेल या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा अभ्यास करणार्या संस्थेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
आय.टी. त भारत आघाडीवरच
भारतामध्ये अजूनही माहिती तंत्रज्ञानासाठी आवश्यक असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे भारत हा जगातला इंग्रजी बोलणार्यांची सर्वाधिक संख्या असणारा देश आहे. या गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत भारताचा पहिला क्रमांक कायम राहील, असे या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी म्हटले आहे.
२००८ साली भारताचा माहिती तंत्रज्ञानाचा व्यवसाय ३० अब्ज डॉलर्स होता. तो २०१० सालपर्यंत ४० अब्ज डॉलर्स व्हावा अशी भारताच्या या क्षेत्रातल्या उद्योजकांची महत्वाकांक्षा होती. मात्र हे उद्दिष्ट पार करून या उद्योगाने त्यापेक्षा अधिक उलाढाल केली आहे. २०११ साली भारताची या क्षेत्रातली उलाढाल १७० अब्ज डॉलर्स एवढी झालेली दिसली आहे. ही रक्कम रुपयात मोजली तर जवळपास साडे आठ लाख कोटी रुपये एवढी होते. भारत सरकारचा एकूण अर्थसंकल्प सोळा लाख कोटी रुपयांचा आहे. परंतु त्याच्या निम्मी रक्कम माहिती तंत्रज्ञानात निर्माण होते. भारताच्या विकासात आणि संपन्नतेत या क्षेत्राचा किती मोठा वाटा आहे याचा अंदाज या आकड्यावरून येतो. या उलाढालीतील साडेपाच लक्ष कोटी रुपयांची उलाढाल आऊटसोर्सिंगमध्ये झालेली असून तीन लाख कोटी रुपयांची उलाढाल सॉफ्टवेअरच्या निर्यातीत झालेली आहे. याशिवाय या क्षेत्रात दरसाल ११ ते १४ टक्के वाढ नोंदवली जात आहे.
