वॉलमार्टचा भारतात छोट्या दुकानांवर भर

नवी दिल्ली दि.१० – जगातील सर्वात मोठी रिटेलर चेन असणार्‍या वॉलमार्टचा भारतातील प्रवेश नक्की झाला असला आणि भारतीशी सहकार्यातून त्यांनी सहा स्टोअर्स सुरू केली असली तरी भारतीय मानसिकता पाहता मोठमोठया हायपरमार्केट ऐवजी वॉलमार्ट भारतात सुपर मार्केटलाच प्राधान्य देईल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.

केवळ शॉपिंगसाठी शहराबाहेर जाण्याची भारतीय जनतेची मानसिकता नाही. त्यामुळे वॉलमार्टला त्यांची दुकाने शहरातच उघडण्यावर भर देणे गरजेचे आहे. शहरात दुकाने उघडायची असतील तर तेथे प्रचंड मोठ्या जागा मिळणे अवघड आहेच पण अशा जागा मिळाल्या तरी त्यासाठी प्रचंड खर्च येऊ शकतो. त्यामुळे भारतात ही कंपनी छोट्या दुकानांनाच प्राधान्य देईल असे वझीर अॅडव्हान्स कन्सल्टंन्सीचे हरमिदर सहानी यांचे मत आहे. 

वॉलमार्टची ओळख हायपर मार्केट अशीच आहे. हापयर मार्केट म्हणजे शहराबाहेर दीड ते अडीच लाख चौ.फूट जागेतील मार्केट. येथे केवळ दैनंदिन वापराच्या वस्तू आणि किराणाच मिळत नाही तर कपड्यांपासून एलेक्ट्रोनिक्स, फर्निचर, औषधे, पेट्रोलपंप अशाही सुविधा असतात. वॉलमार्टने भारतीशी जो सहकार्य करार केला आहे त्यात भारतीची इझी डे स्टोअर्स वॉलमार्ट वापरेल अशी शक्यता आहे. भारतीची देशभरात २०० स्टोअर्स असून ती अडीच हजार चौ.फूटापासून २५ हजार चौ.फूट जागेत आहेत.

वॉलमार्टने यापूर्वी मेक्सिको येथेही अशी छोट्या जागेतील दुकाने सुरू केली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही संकल्पना अगदी नवीन नाही. मात्र भारतात त्यांचा प्रयत्न सुपर मार्केट ऐवजी अॅडव्हान्स सुपर मार्केट सुरू करण्यावर असेल असेही या तज्ञांचे म्हणणे आहे