नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या टी-२० च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा कोट्यवधी चाहत्याची निराशा केली आहे. तसे पहिले तर या स्पर्धेतील धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली. भारताने या स्पर्धेत अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान संघाला चारी मुंड्या चित केले, मात्र ऑस्ट्रेलिया सोबतच्या निर्णायक सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याने भारताला सेमिफायनलपूर्वीच पॅकअप करावे लागले आहे.
भारतीय संघाचा फ्लॉप शो सुरूच
टी-२० च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सुपर आठमध्ये अवघड गटात होता. या गटात नेट रन रेटसाठी एक एक रन महत्वचा होता. त्यामुळे सेमिफायनल मध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रीकेसोबतच्या सामन्यात वेगळी रणनीती आखण्यास हवा होती. मात्र तसे न केल्याने टीम इंडियाला ऐन मोक्याच्या क्षणी विजय मिळूनही सेमीफायनलपासून वंचित राहवे लागले आहे. नशिबाचा भाग कसा असतो वेस्टइंडीजने आता पर्यंत सर्वात कमी सामने जिंकले व निर्णायक सामन्यात विजय मिळवाल्याने त्यांनी फायनलपर्यंत मजल मारली आहे.
टीम इंडियातील काही खेळाडूचा फिटनेसचा प्रोब्लेम होता हे आता उघड झाले आहे. भलेही युवराज सिंगमुळे आपल्याला सामने जिंकता आले असले तरी तो पूर्णपणे फिट नसल्याचे आढळून आले आहे. झहीर खानची अवस्था अजून तशीच आहे. सलग चार षटके टाकल्यानंतर तो थकून जातो. वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीरने एकही सामन्यात गंभीरपणे फलंदाजी केली नाही त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे. गंभीरचा खराब फॉर्म हा गेल्या एक वर्षापासून सुरु आहे मात्र त्याला संघाबाहेर बसविण्याचे धाडस टीम इंडियाकडून का केले जात नाही, हे मात्र समजत नाही.
पियुष चावला ऐवजी अन्य एकाद्या नवीन स्पिनरला संघात स्थान का दिले जात नाही हे एक न उलघडनारे कोडेच आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्च्या निर्णायक सामान्यात वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीला का संधी देण्यात आली हे समजले नाही. त्या उलट जर आर अश्विनच्या मदतीला इंग्लंड विरुद्च्या सामन्यात चांगले प्रदर्शन करणाऱ्या फिरकीपटू हरभजन सिंगला जर संधी दिली असती तर सामन्याचा निकाल वेगळा दिसला असता.
सामना संपल्यानंतर त्यावर टीका टिपणी करणे कोणाला ही सोपे असते. मात्र झालेल्या पराभवाची कारणमिमसा शोधून त्यावर उपाय करणे ही तितकेच महत्वाचे असते. २००७ साली भारताने टी-२० विश्वकप जिंकल्यानंतर त्यानंतर झालेल्या एकाही विश्वचषक स्पर्धेत भारताला सुपर आठच्या पुढे जाता आले नाही. या सर्व स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कर्णधार महेंद्रसिग धोनीने केले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखालीच टीम इंडियाने २०११ सालीचा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतरपासून आतापर्यंत टीम इंडियाचा फ्लॉप शो सुरूच आहे. गेल्या काही दिवसात इंग्लड आणि ऑस्ट्रेलियाकडून कसोटी मालिकेत टीम इंडियाला पराभव स्वीकारवा लागला होता. आशिया कपमध्ये बांगलादेशाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचण्याची संधीही मिळाली नव्हती. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या या फ्लॉप शो नंतर आता नवीन निवड समितीपुढे आगामी काळात योग्य खेळाडूची निवड करून टीम इंडियाला गत वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे.
