श्रीनगर दि.५ – काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला काश्मिरचे दरवाजे उघडून दिले आहेत, असे मत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले. राहुल गांधीसोबत कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज मंडळी रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला इत्यादी काश्मीर दौर्यावर आहेत.
राहुल गांधी यांनी काश्मीर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिलेले वचन पूर्ण करीत, कोर्पोरेट कंपन्यांना काश्मीर खोर्यात आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी ७००हून अधिक विद्यार्थी विद्यापीठात उपस्थित होते. विद्यापीठाच्या बाहेर काही विद्यार्थ्यांनी राहुल गांधीच्या दौर्याला विरोध करीत, राजकारण कॅम्पसच्या बाहेर ठेवा असे सांगितले.
बैठकीत रतन टाटा म्हणाले की, येथे येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करून राहुल गांधीनी योग्य दिशेने योग्य पाऊल उचलले आहे. त्याआधी रतन टाटा यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली.
विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राहुल गांधीनी सांगितले की, विद्यार्थी उद्योगपतींना भेटून खुश झाले. काश्मीरच्या तरुणांच्या मनात विश्वास निर्माण करणे हाच माझा उद्देश आहे.