आगामी काळात धान्य दर उतरण्याची शक्यता

पुणे दि.३ – यंदाचा म्हणजे २०१२-१३ चा खरीप हंगाम देशभर सुरू झाला असून भात, कापूस, साखर, बाजरी, मका व सोयाबीनच्या कापण्या मळण्या शेतकरी वर्गाने पूर्ण केल्या आहेत. हे धान्य बाजारात उपलब्ध होणार असून त्यामुळे धान्याचे दर थोडे कमी होण्याची शक्यता असल्याचे अन्न महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात बाजरीच्या मळण्या झाल्या आहेत तसेच साखर कारखान्यांचा गाळप हंगामही सुरू होत आहे. सोमवारीच याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात बोलताना केली होती. यंदा महाराष्ट्रात दुष्काळामुळे ऊस कमी उपलब्ध आहे. यंदा ५५ दशलक्ष टन ऊसच गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे व हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी आहे.
पंजाब हरियानामधून तांदळाची आवक सुरू झाली असून हे प्रमाण येत्या कांही दिवसांत वाढणार आहे. यंदा या राज्यात १५.६ दशलक्ष टन तांदूळ उत्पादन अपेक्षित आहे. १० आक्टोबरपासून मोठ्या प्रमाणावर हा तांदूळ बाजारात दाखल होईल असे अन्न महामंडळाचे उपमहासंचालक असीम छाब्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की उन्हाळी हंगाम म्हणजे खरीपातील हंगाम हाच सरकारच्या अन्नधान्याचा राखीव साठा करण्याचा मुख्य स्त्रोत असतो. जेव्हा रेशनवरील धान्याची मागणी वाढते, त्या काळात हा साठा वापरला जातो. 

कापसाच्या उत्पादनात जगात दुसर्‍या क्रमांकावर भारत असून यंदा गुजराथ, महाराष्ट्र, मध्यप्रदेशातून कापूस वेचणी सुरू झाली आहे. गुजराथेतून दररोज २ हजार गासड्या बाजारात येत आहेत. तर पंजाब, हरियाना राजस्थानातून चार ते पाच हजार गासड्यांची आवक होत आहे. त्यामुळे कापसाचे दर दोन ते तीन टक्कयांनी उतरले आहेत. आक्टोबरपासून कापूस हंगाम सुरू होतो व यंदा ३३.४ दशलक्ष गासड्या उत्पादनाची अपेक्षा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कापूस उत्पादन ९ टक्कयांनी घटले आहे.

मध्यप्रदेशातून सोयाबीनची आवक सुरू असून दररोज दोन लाख पोती बाजारात येत आहेत. महाराष्ट्रात हेच प्रमाण दररोज २५ हजार पोती असे आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन ९ टक्कयांनी वाढेल असा अंदाज आहे.