व्याजाचे वाढते दर, अर्थव्यवस्थेतील मंदी आणि निर्यात व्यापारात झालेली घट यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली असली तरी देशाच्या ग्रामीण भागाचे चित्र शहरी भागापेक्षा चांगले आहेत. निदान २००९ ते २०१२ या तीन वर्षातील अर्थव्यवस्थेच्या वृध्दीचे आकडे एकत्र केले तर हे सत्य प्रखरपणे समोर येते. ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती हळू हळू वाढत आहे आणि या भागातील लोकांची खर्चाची प्रवृत्तीसुध्दा बदलत आहे. या तीन वर्षांमध्ये ग्रामीण भागातील लोकांच्या खर्च करण्याच्या आकड्यात शहरापेक्षा अधिक वेगाने वाढ झाली आहे. शहरातल्या लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांची खरेदी करण्याची ताकद वाढल्याचे हे लक्ष आहे. क्रिसील या संघटनेने केलेल्या पाहणीत ही गोष्ट लक्षात आली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्था तेजीत
२००९ ते २०१२ या कालावधीत भारतातील शहरी लोकांनी २ लाख ९९ हजार ४०० कोटी एवढ्या किमतीच्या गृहोपयोगी वस्तू खरेदी केल्या. मात्र खेड्यातल्या याच काळात ३ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू विकत घेतल्या. गेल्या २० वर्षात प्रथमच ही गोष्ट दिसून आली आहे. अन्यथा ग्रामीण भागातील परिस्थिती शहरांपेक्षा वाईट असते. असे मानले जाते. ग्रामीण भागातील लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. आणि शहरी भागातील प्रमाण २८ टक्के आहे. परंतु ग्रामीण भागात प्रामुख्याने केला जाणारा शेती व्यवसाय आणि त्याची वाईट अवस्था यामुळे ग्रामीण भागातली लोकसंख्या जास्त असून सुध्दा शहरातल्या लोकांचा एकूण खर्च ग्रामीण भागापेक्षा जास्त असतो.
गेल्या २० वर्षात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांचा खर्चाच्या बाबतीत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला तेव्हा शहरी भागातले लोक संख्येने कमी असूनसुध्दा त्यांची क्रयशक्ती खेड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांची खरेदीही मोठी असते असे दिसून आले. या २० वर्षात पहिल्यांदाच खर्चाच्या बाबतीत ग्रामीण भागाने शहरांवर मात केलेली आहे. ग्रामीण भागातील मजूर सामान्यतः शेतीवर आणि शेतकर्यांवर अवलंबून असतात परंतु शेती व्यवसाय पावसाच्या लहरीवर अवलंबून असल्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर या दोघांचीही अवस्था यथातथाच असेल.
आता मात्र ग्रामीण भागातील शेतावर अवलंबून असणारा मजूर शेतीतून बाहेर पडत आहे आणि मजुरीसाठी नवीन क्षेत्रे शोधत आहेत. या क्षेत्रातील मालकांची मजुरी देण्याची ऐपत शेतकर्यांपेक्षा जास्त आहे. मजुरांची कमतरता असल्यामुळे हे मजूर अशा ऐपतदार मालकांकडून भरपूर मजुरी मागून घेत आहेत आणि त्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढली आहे.
