गोल्ड रिफायनरींच्या व्यवसायात तेजी

मुंबई दि. १ – राज्यात दुष्काळाच्या झळांनी होरपळलेले शेतकरी बि बियाणे, खतांसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वर्षानुवर्षाच्या मेहनतीने पै पै करून साठविलेले सोने आता चढ्या दरांमुळे बाजारात विक्रीला आणत असल्याने देशातील गोल्ड रिफायनरींचा व्यवसाय मात्र तेजीत आला आहे. ग्रामीण भागातून सध्या बाजारात विक्रीसाठी येणार्‍या सोन्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. याचे मुख्य कारण दुष्काळ असला तरी सोने आयात शुल्कात करण्यात आलेली वाढ आणि रूपयाचे अवमूल्यन यामुळे सोन्याचे दरही ३२ हजारांची पातळी ओलांडून पुढे निघाले आहेत. अशा परिस्थितीत घरात असलेले सोने मोडूनच देणी भागविणे शेतकरी वर्ग पसंत करत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

सोन्याच्या आयातीत भारताचा जगात पहिला क्रमांक आहे. कांही काळ हा मान चीनने घेतला होता. भारतातील एकूण लोकसंख्या विचारात घेतली तर त्यांच्याकडे २० ,००० टन सोने दागिने, नाणी, बार स्वरूपात आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मताप्रमाणे भारतातील नागरिकांच्या घरात असलेला सोन्याचा साठा यूएस फेडरल रिझर्व्हच्या तिप्पट आहे.

बॉम्बे बुलियन असोसिएशचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी या संबंधात अधिक माहिती देताना म्हणाले की या वर्षात रिसायकलिंगसाठी अंदाजे ३०० टन सोने बाजारात येईल असे अनुमान आहे. गतवर्षी हे प्रमाण अवघे ५८.५ टन होते. यंदा दुष्काळाने शेतकरी वर्ग नवीन खरेदी करणार नाही उलट सोने मोडण्याकडेच त्यांचा जादा कल आहे. यंदाच्या वर्षात रिसायकलिंगला येणार्‍या सोन्याचे प्रमाणे गत दशकातील सर्वात मोठे प्रमाण आहे. आणखी कांही वर्षे तरी आपल्या देशातील सोने फायनरीजची ५० टक्के गरज या मोडीत आलेल्या सोन्यातूनच पूर्ण होईल असा अंदाज आहे. अन्यथा या रिफायनरीज प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झरर्लंड देशांतून होणार्‍या आयातीवरच अवलंबून होत्या. भारतातील रिफायनरीजची क्षमता वर्षाला १०० टन सोने गाळण्याची आहे.

मुंबईतील झवेरी बाजारात असे सोने गाळण्याचे अनेक उद्योग परंपरागत रितीने चालविले जात आहेत. तसेच मुंबईतील नॅशनल इंडियन बुलियन रिफायनरीने त्यांच्या व्यवसायाचा विकास करण्याचे ठरविले असून पूर्वी येथे ३० टन सोने गाळले जात होते असेही समजते.