शाळा सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार केंद्र सरकार


नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अद्यापही लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे देशातील यंदाचे शैक्षणिक वर्ष अद्यापही जसे म्हणावे तसे सुरु झालेले नाही. सध्यातरी देशातील सर्वच शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून शाळा शिकत असल्यामुळे शाळा किंवा कॉलेजेच नेमके कधी सुरु होणार, याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांनाही उत्सुकता लागली आहे. त्यातच आता शाळा व महाविद्यालये सुरु करण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्यानुसार, 10 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत शाळा अन् कॉलेज सुरु करण्याचा विचार आहे. त्यातही, सोशल डिस्टन्स आणि खबरदारी आवश्यक असणार आहे.

सर्वप्रथम उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालये केंद्र सरकारकडून सुरू होणार आहेत. त्यानंतर, 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी सरकार काही पर्यायांचा अवलंब करणार आहे. त्यानुसार एखाद्या शाळेत एकाच इयत्तेचे 4 वर्ग भरत असतील, तर त्या शाळेत केवळ 2 वर्गच भरविण्यात येतील. एक दिवसाआड पद्धतीने हे वर्ग भरविण्यात येणार आहेत. तसेच, शाळा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर शाळेतील सर्व वर्गांचे सॅनिटायझ करण्यात येतील. तसेच, शाळेत केवळ 33 टक्केच स्टाफला हजर राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

या महिनाअखेरीस शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाऊ शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील शाळा बंद असून ऑनलाईन प्रवेश आणि शिक्षण सुरू झाले आहे. कोरोनाच्या भितीमुळे पालकही आपल्या मुलांना शाळेत पाठवायला इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे.