इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित करणार: निवडणूक आयोग

नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अधिक सुरक्षित बनविण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून त्या दृष्टीने या विषयातील तज्ज्ञ आणि विविध राजकीय पक्षांशी चर्चा सुरू असल्याची ग्वाही आयोगाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार करणे शक्य असल्याचा दावा करून जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला प्रिंट आऊटची सुविधा प्रदान करावी अथवा पूर्वीप्रमाणेच कागदी मतदान पत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेची सुनावणी न्या. पी. सत्यशिवम आणि न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर पार पडली. याबाबत आयोगाने आपले म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आयोगाची बाजू मांडताना आयोगाचे वकील अशोक देसाई म्हणाले की; इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात अधिक सुधारणा करून ते अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आयोगाने पावले उचलली आहेत. त्यासाठी आयोगाची तांत्रिक विशेषज्ञ आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी चर्चा सुरू आहे.

या याचिकेवरील पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार आहे.