व्हिडीओ : … म्हणून मुंबईच्या पावसात रस्त्यावर तब्बल 5 तास उभी होती ही महिला

मुंबईमध्ये मागील 2-3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. या स्थितीने मुंबईकरांना पुन्हा एकदा 26 जुलै 2006 ची आठवण आली. सोशल मीडियावर या मुसळधार पावसातील घटनांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. अशाच एका महिलेचा सध्या व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

https://www.facebook.com/watch/?v=295296948466388&t=27

महिला रस्त्यावर साचलेले पाणी जाण्यासाठी मॅनहोल उघडून तेथे तब्बल 5 तास उभी होती. जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना नुकसान पोहचणार नाही. एका फेसबुक युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून, व्हिडीओ शेअर करत दावा करण्यात आला आहे की, हा माटुंगा वेस्टचा तुलसी पाईप रोड आहे. या महिलेने मॅनहोल उघडला आणि त्यानंतर 5 तास तेथेच उभ्या होत्या. त्यांना सलाम !

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला साचलेले पाणी जाण्यासाठी मॅनहोल उघडून, त्याच्या झाकणावर उभी आहे. उघड्या मॅनहोलचा गाड्यांना त्रास होऊ नये वाहनचालकांना लांबून जाण्यास सांगत आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितली आहे.