प्रतिभाताईंना मिळालेल्या भेटी परत करण्याच्या सूचना

नवी दिल्ली दि.२६- राष्ट्रपतीपद भूषवितानाच्या पाच वर्षांच्या काळात मिळालेल्या भेटी कार्यकाल संपल्यानंतर राष्ट्रपतीभवन सोडताना प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या अमरावतीच्या घरी नेल्याने त्या वादात सापडल्या आहेत. माहिती अधिकार हक्क कायद्याखाली कार्यकर्ते सुभाष आगरवाल यांनी न्यायालयात याविषयी याचिका दाखल करून या सर्व भेटी १३ जानेवारी २०१३ पर्यंत परत मागविल्या जाव्यात असा अर्जही केला होता. या अर्जाला उत्तर देताना सर्व भेटी परत मागविल्या जातील असे आगरवाल यांना कळविण्यात आले असून नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणवदा मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेताच हा निर्णय घेतला असल्याचे प्रसिडेंट प्रेस सेक्रेटरीकडून सांगण्यात आले आहे.

यासंबंधाने प्रतिभाताई पाटील यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता त्यांनी अजून असे कोणतेही पत्र किवा सूचना त्यांना मिळाल्या नसल्याचे सांगितले आहे. प्रतिभाताईंनी घरी नेलेल्या भेटीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून मिळालेल्या पेटीचाही समावेश आहे असे समजते. प्रतिभाताईंच्या अगोदर राष्ट्रपती असलेले डॉ.कलाम यांनीही त्यांना मिळालेल्या भेटी बरोबर नेल्या होत्या मात्र त्या ते काम करत असलेल्या डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन या संस्थेत प्रदर्शन मांडून ठेवण्यात आल्या आहेत. नियमानुसार राष्ट्रपती अथवा तत्सम पदावरील व्यक्तींनी त्यांना मिळालेल्या भेटी सरकारजमा करावयाच्या असतात असेही समजते.