महडचा वरदविनायक

रायगड जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. याच रायगड जिल्ह्यातील महड हे असेच एक सुंदर आणि टुमदार गांव. या गावांतील वरदविनायक हा अष्टविनायकातील चवथा गणपती. वरद विनायक याचा अर्थच सार्‍या इच्छांची पूर्ती करणारा आणि वर देणारा असा आहे. पूर्वीच्या काळी या भागाला भद्रक असे संबोधले जात असे. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे मंदिरातील अखंड नंदादीप. १८९२ सालापासून हा नंदादीप अखंड तेवता आहे असे सांगितले जाते.

Mahad-Varada-Vinayak1

पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचा गेल्या कांही वर्षांपूर्वीच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी हत्तींच्या मूर्ती असून उत्तरेकडे आहे गोमुख. या गोमुखातून तीर्थाचा प्रवाह सतत वाहतो आहे. पश्चिमेकडे पवित्र कुंड आहे. मंदिरातील गणेशाची मूर्तीही नुकतीच बसविली गेली असून ती पूर्वाभिमुख आणि बैठी आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती आहे. मूळ मूर्ती खराब झाल्याने जुनी मूर्ती हलवून नवी बसविली गेली असली तरी जुनी मूर्ती गर्भगृहातून हलवायची नाही या वादात प्रकरण न्यायालयात गेले आहे. म्हणजे देवांनाही कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धीसिद्धी आहेत. गणेशाच्या दोन मूर्तींपैकी एक मूर्ती शुभ्र संगमरवरातील आहे तर दुसर्‍या मूर्तीवर शेंदुराचे कवच आहे.

Mahad-Varada-Vinayak

असे सांगितले जाते की धोंडू पौडकर यांना वरदविनायकाची मूर्ती १६९० साली तळ्यात मिळाली. मात्र त्यावर १७२५ सालात कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी वरद विनायकाचे मंदिर बांधले. मंदिरातील घुमटावर नागराजांची चित्रे आहेत. गणपतीची पूजा कुणालाही करता येते. मंदिर कौलारू आणि अगदी साधे पण सुंदर आहे.

पुणे मुंबई महामार्गावरील खोपोलीपासून हे गांव अगदी जवळ आहे. पुण्यापेक्षा मुंबईहून येथे जाणे अधिक जवळ पडते.