मुंबई दि.२४- देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत बँकातून पैसे चोरी होणे, लुटले जाणे यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला असून २००७ ते २०११ या काळात त्यापोटी बँकांना १८ कोटी ९७ लाख रूपयांचे नुकसान सोसावे लागले असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारात सर्वाधिक नुकसान झालेल्या शहरात मुंबई प्रथम असून त्यानंतर नाशिक व पुण्याचा क्रमांक आहे असेही या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुंबईत हे नुकसान ११.४ कोटी रूपये इतके आहे. महाराष्ट्रात विविध बँकातून करण्यात आलेल्या चोर्या व दरोड्यांच्या ८७६ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. पैकी १०५ केवळ मुंबईतल्या आहेत.
बँकेतून पैसे लुटण्याच्या घटनांत महाराष्ट्र अव्वल
विशेष म्हणजे गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असलेल्या उत्तरप्रदेश, बिहार व मध्यप्रदेश ही राज्ये महाराष्ट्रातील आकडेवारीच्या जवळपास सुद्धा नाहीत असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ बँक लुटणे व बँकेतील चोर्यांत केरळ दुसर्या क्रमांकावर असून तेथे नुकसानीचा आकडा १६ कोटी ८८ लाखांवर असून १०० गुन्हे नोंदले गेले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकचा नंबर असून तेथे १२ कोटी ४६ लाख रूपये नुकसान झाले आहे व ६८१ गुन्हे दाखल केले गेले आहेत.
बँकांना वेळोवेळी सूचना देऊनही पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवणे, सीसीटिव्ही कॅमेरे न बसविणे, असल्यास ते नादुरूस्त असणे, बँकेच्या जबाबदार अधिकार्यांनी महत्त्वाच्या किल्लया व पासवर्डची माहिती सुरक्षा रक्षक, वॉचमन, झाडूवाले, ऑफिसबॉय अशा लोकांदेखत ठेवणे यामुळे या घटनांत वाढ होत असल्याचे पोलिस अधिकार्यांचे म्हणणे आहे.
