नवी दिल्ली: महागाई, कोळसाकांड, आर्थिक सुधारणांच्या अनुषंगाने घेण्यात आलेले धाडसी निर्णय या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित असल्याचे संकेत काँग्रेसच्या सूत्रांनी दिले. काही मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे तर काही नवीन चेहेर्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. मोठ्या प्रमाणात खातेबदल होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली.
परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांना नारळ देऊन त्यांची रवानगी पुन्हा कर्नाटकच्या राजकारणात केली जाण्याची शक्यता आहे. कोळसाकांड प्रकरणामुळे कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल आणि पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांचीही सुट्टी होण्याची शक्यता आहे. खाण मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांच्या मतदारसंघात कॉंग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांनाही मंत्रीपद गमवावे लागणार आहे.
तृणमूल काँग्रेसचे मुकुल रॉय यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे मंत्रालय आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असून ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांच्याकडे ती जबाबदारी सोपविली जाईल. एकापेक्षा अधिक मंत्रालयाचा भार एकाच मंत्र्याला न देता मीनाक्षी नटराजन, ज्योती मिर्धा, जनार्दन द्विवेदी, रेणुका चौधरी, के, रेहमान खान, दीपा दासमुन्शी, अधीर चौधरी, चिरंजीवी, मनीष तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर यांची मंत्रीपदावर वर्णी लागू शकते.